Advertisement

आरोग्यासाठी प्रत्येक महिलेनं 'या' ५ चाचण्या करणं आवश्यक

आज आम्ही तुम्हाला अशाच ५ चाचण्या सांगणार आहोत ज्या गरजेच्या आहेत. या चाचण्या प्रत्येक स्त्रीनं योग्य वयात आणि वेळेत केल्याच पाहिजेत.

आरोग्यासाठी प्रत्येक महिलेनं 'या' ५ चाचण्या करणं आवश्यक
SHARES

आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकालाच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु आरोग्य तपासणी हे बहुतांश महिलांच्या प्राधान्यक्रमातील शेवटचे काम असते. महिला सुरुवातीला होणाऱ्या छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष करतात किंवा अंगावर काढतात. पण भविष्यात त्याचा त्रास जाणवू लागतो.

त्यामुळे वेळीच जर योग्य तपासण्या केल्या तर भविष्याच होणारे आजार टाळता येऊ शकतात. यासाठीच महिलांनी दर सहा महिन्यांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ चाचण्या सांगणार आहोत ज्या गरजेच्या आहेत. या चाचण्या प्रत्येक स्त्रीनं योग्य वयात आणि वेळेत केल्याच पाहिजेत.

१) पॅप स्मिअर टेस्ट

  • का केली पाहिजे?

पॅप स्मिअर टेस्टमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत वेळीच माहिती होऊ शकते. याशिवाय गर्भाशय सुस्थितीत आहे अथवा नाही, हेही स्पष्ट होते. ही चाचणी केल्यानंतर गर्भाशयाच्या पेशींमध्ये काही बदल दिसले, तर ती पुन्हा करावी लागू शकते. गर्भाशयात कॅन्सरचे विषाणू असतील तर त्यांचे प्रमाण किती आहे, हेही या चाचणीतून लक्षात येते.

  • कुठल्या वयात करणं गरजेचं?

३० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी पॅप स्मिअर टेस्ट चाचणी करणं गरजेचं आहे. नियमित लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलांनी तर ही चाचणी केलीच पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीन वर्षांतून एकदा तरी ही चाचणी केली पाहिजे.

२) मॅमोग्राफी स्क्रीनिंग

  • का केली पाहिजे?

स्तनांमध्ये गाठ असेल किंवा कॅन्सरसारखी लक्षणे दिसत असतील, तर मॅमोग्राफी स्क्रीनिंगद्वारे त्याची शहानिशा करता येते. बदलत्या जीवनशैलीमुळे स्तनांच्या कर्करोगाने पीडित महिलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही चाचणी करून स्तनांच्या कर्करोगाला वेळीच आळा घालता येतो. याशिवाय सामान्य स्क्रिनिंग आणि 'सेल्फ ब्रेस्ट एक्झाम' पद्धतीनेही स्तनांच्या कर्करोगाची चाचपणी करता येते.

  • कुठल्या वयात करणं गरजेचं?

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, ३० ते ४५ वर्षे वय असलेल्या प्रत्येक महिलेने वर्षातून किमान एकदा मॅमोग्राफी स्क्रीनिंग केले पाहिजे.

३) थायरॉईड

  • का केली पाहिजे?

महिलांनी थॉयरॉइड फंक्शन टेस्ट आणि कम्प्लीट ब्लड काउंट या दोन्ही चाचण्या केल्या पाहिजेत. सातत्याने मूड बदलणे, वजन कमी जास्त होणे, मासिक पाळी नियमित न येणे, व्यवस्थित झोप न लागणे ही थॉयरॉइडची लक्षणे आहेत. यातील एखादे लक्षण आपल्यात दिसत असेल, तर थॉयरॉइड फंक्शन टेस्ट केली पाहिजे.

  • कुठल्या वयात करणं गरजेचं?

तिसाव्या वर्षानंतर हार्मोन्समधील बदलांमुळे अनेक महिलांना थॉयरॉइडचा त्रास होतो. वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांतून एकदा थॉयरॉइड टेस्ट केली पाहिजे.

४) कोलेस्ट्रॉल

  • का केली पाहिजे?

या चाचणीमुळे हृदयाशी संबंधित समस्या वेळीच उघडकीस येऊ शकतात.

  • कुठल्या वयात करणं गरजेचं?

विसाव्या वर्षानंतर प्रत्येक महिलेनी चार ते सहा वर्षांतून एकदा कॉलेस्टोरॉलची चाचणी करावी, असा सल्ला 'अमेरिकन हार्ट असोसिएशन' देते.

५) बॉडी मास्क इंडेक्स

  • का केली पाहिजे?

यासाठी बॉडी मास्क इंडेक्स तपासून घ्यावा. यामुळे तुम्ही लठ्ठ आहात की नाही हे समजेल, शिवाय लठ्ठपणामुळे बळावणारे आजार दूर ठेवता येतील.

  • कुठल्या वयात करणं गरजेचं?

अठराव्या वयापासून लठ्ठपणाबाबत चाचणी करून घ्यावी.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा