बीडीडीवासीयांची बायोमेट्रीक सर्वेविरोधात म्हाडावर धडक

 Bandra East
बीडीडीवासीयांची बायोमेट्रीक सर्वेविरोधात म्हाडावर धडक
Bandra East , Mumbai  -  

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात आलेला बायोमेट्रीक सर्वे बंद पाडल्यानंतर आता बीडीडीवासीयांनी बायोमेट्रीक सर्वे नकोच अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार 'बायोमेट्रीक सर्वेक्षण नको' या मागणीसाठी अखिल बीडीडी चाळ रहिवाशी महासंघाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांच्यासह अनेक बीडीडीवासीय बुधवारी म्हाडावर धडकले. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांची भेट घेत बायोमेट्रीक सर्वे रद्द करावा, संमती न घेण्याची अट काढून टाकावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन लाखे यांना सादर केले. यावेळी लाखे यांनी या मागण्यांचा योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.

झोपु योजनांसाठी बायोमेट्रीक सर्वे राबवण्यात आला. पण हा सर्वे अयशस्वी ठरल्याने तिथेही बायोमेट्रीक सर्वे बंद करण्यात आला. असे असताना बीडीडीसाठी बायोमेट्रीक सर्वे का? असा सवाल बीडीडीवासीयांनी यावेळी केला. बायोमेट्रीकमध्ये अनेक अडचणी असून, मुळात बीडीडीमध्ये पात्र-अपात्रता ठरवण्याची गरजच नसल्याची भूमिका वाघमारे यांनी घेतली आहे. घराच्या बदली घर द्या, ज्या व्यक्तीचे सध्याच्या भाडेपावतीवर नाव आहे, त्याच्या नावे घर द्या अशी मागणीही बीडीडीवासीयांकडून यावेळी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे पुनर्विकास योजना असो वा झोपु योजना, सर्व योजनांमध्ये रहिवाशांची संमती आवश्यक असते. असे असताना बीडीडीसाठी संमतीची अटच काढून टाकत बीडीडीवासीयांवर अन्याय केला आहे. त्यामुळे संमतीची आवश्यकता नसल्याची अट रद्द करण्याची मुख्य मागणी बीडीडीवासीयांची आहे. या सर्व मागण्या मान्य झाल्या, तरच बीडीडीचा पुनर्विकास होऊ दिला जाईल, अन्यथा पुनर्विकासाची एक वीटही रचू देणार नाही, असा इशाराही यावेळी वाघमारे यांच्यासह बीडीडीतील रहिवाशांनी दिला आहे.

Loading Comments