Advertisement

म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागणार


म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागणार
SHARES

मुंबई - म्हाडा वसाहतींचे 35 लेआऊट (अभिन्यास) प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडे गेल्या कित्येक वर्षांपासून मंजुरीसाठी प्रतिक्षेत होते. त्यातील सहा लेआऊटला नुकतीच पालिकेने मंजुरी दिली आहे. अंधेरीतील एस. व्ही. पी. नगर आणि आझादनगर, घाटकोपरमधील पंतनगर, कुर्ल्यातील नेहरूनगर, विक्रोळीतील कन्नमवारनगर आणि बोरिवलीतील अशोकवन या सहा वसाहतींच्या लेआऊटला मंजुरी मिळाल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे आता या सहा वसाहतींचा पुनर्विकासही मार्गी लागण्यास मदत होईल, असेही स्पष्ट केले आहे.

इमारत बांधताना भूखंडावरील आरक्षण, रस्ते तसेच उद्यान यावर किती अतिरिक्त एफएसआय अर्थात प्रोरेटा मिळतो याचा आराखडा म्हणजे लेआऊट. लेआऊटला मंजुरी मिळाल्यानंतर प्रोरेटा किती मिळणार हे स्पष्ट होते. प्रोरेटा मिळाल्यानंतरच इमारतीचं बांधकाम करणे शक्य होते. त्यामुळे लेआऊट मंजुरी म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. असे असताना गेल्या कित्येक वर्षांपासून म्हाडाचे 35 लेआऊट पालिकेकडे मंजुरीसाठी पडून होते.

म्हाडाने लेआऊट मंजुरीसाठी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत नुकतेच सहा लेआऊट मंजूर करून घेतले आहेत. तर लवकरच उर्वरित लेआऊटही मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात म्हाडा आहे. दरम्यान लेआऊट मंजूर झाल्याने या सहा वसाहतीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा