Advertisement

अपघातमुक्त प्रवासासाठी समृद्धी महामार्गावर 'ही' यंत्रणा बसवणार

मुंबई ते नागपूरदरम्यानचा ७०१ कि.मी. लांबीचा संपूर्ण समृद्धी महामार्ग २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.

अपघातमुक्त प्रवासासाठी समृद्धी महामार्गावर 'ही' यंत्रणा बसवणार
SHARES

मुंबई ते नागपूरदरम्यानचा ७०१ कि.मी. लांबीचा संपूर्ण समृद्धी महामार्ग २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित, अपघातमुक्त व्हावा, तसेच वाहतुकीला शिस्त लागावी या दृष्टीने महामार्गावर ‘अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन’ यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अत्याधुनिक अशा या यंत्रणेमुळं मार्गावरील वाहतुकीचं नियमन करून चालकांना शिस्त लावण्यात येणार आहे. अपघात रोखण्यासाठी अत्यावश्यक त्या सर्व उपयोजना करण्यात येणार आहेत. याकरीता कोरियातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून यासाठी लागणारा निधी कर्जरूपाने उपलब्ध करण्यात येणार आहे.

एमएसआरडीसी या यंत्रणेसाठी लवकरच जागतिक स्तरावर निविदा मागविणार आहे. सरळ रेषेत, गतिरोधक नसलेल्या मार्गावरून ताशी १५० किमी वेगाने वाहने धावणार आहेत. त्यामुळं या मार्गावर अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने हा प्रवास सुरक्षित, अपघातमुक्त व्हावा यासाठी अत्याधुनिक अशी ‘अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

महामार्गावर वाहतूक शिस्त पाळली जावी, अपघात टाळता यावेत या उद्देशाने वाहतूक नियमन करण्याकरिता, अपघातग्रस्तांना तातडीनं मदत पोहोचविण्यासाठी तसंच जलद, अचूक, पारदर्शक पद्धतीनं टोलवसुली व्हावी यासाठी महामार्गावर अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी कोरियाचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

अंदाजे १३०० कोटी रुपये खर्चाच्या या यंत्रणेसाठी कोरियाच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फंडकडून (ईडीसीएफ) निधी उपलब्ध होणार आहे. यासाठी कोरिया आणि केंद्र सरकार यांच्यात लवकरच करार होणार आहे. हा करार झाल्यानंतर निविदा काढण्याचा मार्ग मोकळा होईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा