Advertisement

समृद्धी महामार्गाविरूद्ध शेतकऱ्यांचा 26 एप्रिलला शहापूरात चक्काजाम


समृद्धी महामार्गाविरूद्ध शेतकऱ्यांचा 26 एप्रिलला शहापूरात चक्काजाम
SHARES

मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस-वे अर्थात समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा असलेला विरोध आता आणखी तीव्र झाला आहे. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनासाठीच्या भू-मोजणीला विरोध करणाऱ्या नाशिकमधील 42 शेतकऱ्यांविरोधात बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे समृद्ध महामार्गाविरोधातील आंदोलन चिघळले असून 26 एप्रिलला ठाण्यातील शहापूरमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी धडकणार असून चक्काजाम करणार असल्याची माहिती शेतकरी संघर्ष कृती समितीचे राजू देसले यांनी दिली आहे.

सुमारे 710 किमी लांबीच्या या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेक गावं, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करायच्या आणि तिथे टाऊनशीप, स्मार्टसिटी उभारत बिल्डरांचे उखळ पांढरे करून देत गरीब शेतकऱ्याला जिवंत मारून टाकायचे, असा सरकारचा डाव आहे. त्यामुळे ही समृद्धी नेमकी कुणाची? शेतकऱ्यांची की बिल्डरांची, असा प्रश्नही देसले यांनी उपस्थित करत मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाची गरजच नसल्याचे म्हणत हा प्रकल्पच रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुंबई-नागपूर हे 800 किमीचे अंतर पार करण्यासाठी 15 ते 16 तास लागतात. हा वेळ आणि हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाला शक्य तितक्या लवकर सुरूवात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया वेगात सुरू आहे. हा सुपर एक्स्प्रेस-वे 10 जिल्हे, 30 तालुके आणि 354 गावांमधून जाणार आहे. त्यानुसार या 10 जिल्ह्यांमधील 20 हजार 820 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र ठाण्यासह दहाही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिल्याने शेतकरी विरूद्ध सरकार असा संघर्ष तीव्र झाला आहे. सुपीक जमिनी संपादीत करत त्यावर टाऊनशीप उभारत बिल्डरांच्या घशात या जमिनी टाकल्या जाणार असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष कृती समितीसह किसान सभेने केला आहे. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारविरोधात न्यायालयीन लढाईची तयारीही सुरू केल्याचेही देसले यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारी मोजणीला विरोध करणे, पोलिसांवर दगडफेड करणे, पोलिसांच्या गाड्या जाळणे हा गुन्हा नाही का? याविरोधातील गुन्हे खोटे कसे? मुळात हा मार्ग खेड्या-पाड्यातून, जिथे कोणत्याही पायाभूत सुविधा विकसित नाहीत अशा परिसरातून जाणारा आहे. तेव्हा तिथे बिल्डर येऊन काय करणार? पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, जनतेचा प्रवास सुकर व्हावा, हाच उद्देश या प्रकल्पामागे असल्याने निश्चितच ही समृद्धी जनतेचीच आहे. मुळात खूप कमी शेतकऱ्यांचा विरोध आता उरला असून हा विरोध दूर करण्यासाठी वाटाघाटी समिती काम करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी या प्रकल्पात घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे ही आमची विनंती आहे.

के. व्ही. कुरूंदकर, सहव्यवस्थापकीय संचालक -2, एमएसआरडीसी

सध्या मुंबई-नागपूर दुपदरी मार्ग असताना नव्या मार्गाची गरज नाही. हाच मार्ग चौपदरी वा सहापदरी करावा आणि मुंबई-नागपुरवासियांना दिलासा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजवादी नेते प्रकाश रेड्डी यांनी केली आहे. शेतकऱ्यांची सुपीक जमीन अशी बिल्डरांच्या ताब्यात कोणत्याही परिस्थितीत जाऊ दिली जाणार नाही. शेतकरी आणि आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आता मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढू. पण हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही रेड्डी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या या विरोधामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

असा आहे मुंबई - नागपूर सुपर एक्स्प्रेस-वे अर्थात समृद्ध महामार्ग

710 किमी अंतराचा महामार्ग

नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे अशा दहा जिल्ह्यांतून जाणार

30 तालुके आणि 354 गावांतून जाणार

सुमारे 20 हजार 820 हेक्टर जमीन संपादीत करणार

प्रकल्पात 24 टाऊनशीपचा विकास करणार

710 किमी अंतर केवळ आठ तासात पार करता येणार

मात्र यासाठी प्रवाशांना भरमसाठ टोल मोजावा लागणार

16 पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम

एकूण खर्च अंदाजे 46 हजार कोटी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा