Advertisement

‘एमएमआरसी’चे गोलमाल


‘एमएमआरसी’चे गोलमाल
SHARES

मुंबई - मेट्रो-3 प्रकल्पातील घोटाळ्यांची मालिका काही संपताना दिसत नाही. दररोज नवनवीन घोटाळे वा आरोप समोर येत आहेत. त्यानुसार मेट्रो-3 प्रकल्पातील घोटाळ्यांच्या मालिकेत आता आणखी नव्या घोटाळ्याची भर पडली आहे. हा घोटाळा म्हणजे मुंबई मेट्रो रेल काँर्पोरेशन (एमएमआरसी)ने बांधकामासाठी परवानगी घेतली एका ठिकाणी, पण काम मात्र सुरू केलंय भलत्याच ठिकाणी. कफ परेड मेट्रो स्थानकासाठी प्रेसिडेन्ड हॉटलेजवळील रस्त्यावर काम करण्यासाठी एमएमआरसीला परवानगी मिळाली असताना एमएमआरसीने रस्त्याजवळील एका पार्कमध्ये, तेही ना विकास क्षेत्रातील पार्कमध्ये काम सुरू केल्याचा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आणि झांडाच्या कत्तलीविरोधातील याचिकाकर्ते झोरू बाथेना यांनी केला आहे. तर हा खूप मोठा घोटाळा असल्याचेही स्पष्ट केले आहे.

कफ परेड मेट्रो स्थानकासाठी एमएमआरसीने प्रेसिडेन्ट हॉटेलजवळील पार्कमध्ये बांधकाम करण्यासाठी सरकारकडे, पालिकेकडे परवानगी मागितली. पण हे क्षेत्र सीआरझेडमध्ये, ना विकास क्षेत्रात येत असल्याने या पार्कवर बांधकामास परवानगी नाकारली. त्यामुळे एमएमआरसीने नंतर पार्कलगतच्या रोडवर बांधकाम करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार सरकारने हा प्रस्ताव मंजूर करत रोडवर बांधकाम करण्यास परवानगी दिली. असे असताना प्रत्यक्षात मात्र एमएमआरडीएने गोलमाल करत पार्कमधील झाडांची आधी कत्तल केली आणि तिथेच काम सुरू केल्याची बाब समोर आली आहे. बाथेना यांनी यासंबंधीची सर्व कागदपत्रे, पुरावे आपल्याजवळ असल्याचे म्हणत एमएमआरसीचा हा घोटाळा आता न्यायालयासमोर उघड करणार असल्याचे ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितले आहे.

एमएमआरसीचे कार्यकारी संचालक (नियोजन) आर रमण्णा यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. जिथे काम सुरू आहे त्या ठिकाणच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या असून, सीआरझेडमध्ये ही जागा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर रोड आणि पार्क या दोन्ही ठिकाणी काम करण्यात येणार असून, त्यासाठी पालिका आणि कलेक्टर या दोन्ही यंत्रणांकडून जमीन एमएमआरसीला हस्तांतरीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एमएमआरसीने आरोप नाकारले असले तरी याचिकाकर्ते मात्र एमएमआरसी दिशाभूल करत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता एमएमआरसी विरूद्ध सेव्ह ट्री यांच्यातील वाद आणखी रंगणार हे नक्की.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा