Advertisement

विजय मल्ल्याच्या किंशफिशर हाऊसची ५२ कोटींना विक्री

किंगफिशर हाऊसमध्ये बेसमेंट, तळमजला, वरचा तळमजला आणि एक वरचा मजला आहे. या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्रफळ १,५८६ चौ. मीटर इतके आहे. तर ज्या जागेवर ही इमारत आहे त्या प्लॉटचे क्षेत्रफळ २,४०२ चौ. मीटर इतके आहे.

विजय मल्ल्याच्या किंशफिशर हाऊसची ५२ कोटींना विक्री
SHARES

भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याच्या मुंबईतील किंगफिशर हाऊसची ५२.२५ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. हैदराबाद येथील एक बांधकाम व्यावसायिकाने किंगफिशर हाऊस विकत घेतलं आहे. 

विजय मल्ल्याच्या मालमत्तेचा लिलाव सुरूच आहे. मल्ल्याच्या मालकीची सध्या बंद असलेली विमान कंपनी किंगफिशर एअरलाइन्सचे मुंबईतील मुख्यालय किंगफिशर हाऊसचा लिलाव करण्यात आला. हैदराबादस्थित सॅटर्न रिअल्टर्सने किंगफिशर हाऊस  ५२.२५ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ सांताक्रूझ येथे किंगफिशर हाऊस ही इमारत आहे. किंगफिशर हाऊसमध्ये बेसमेंट, तळमजला, वरचा तळमजला आणि एक वरचा मजला आहे. या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्रफळ १,५८६ चौ. मीटर इतके आहे. तर ज्या जागेवर ही इमारत आहे त्या प्लॉटचे क्षेत्रफळ २,४०२ चौ. मीटर इतके आहे.

मल्ल्याला कर्ज देणाऱ्या बॅंकांनी किंगफिशर हाऊस विकण्याचे अनेक प्रयत्न याआधी केले होते. मात्र त्यांना किंगफिशर हाऊससाठी ग्राहक मिळत नव्हते. बाजारभावानुसार किंगफिशर हाऊसची मूळ किंमत १५० कोटी रुपये आहे. २०१६ साली या इमारतीचा पहिल्यांदा लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावासाठी इमारतीची बेस प्राइस १३५ कोटी ठेवण्यात आली होती. मात्र, खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर आठ वेळा प्रयत्न करूनही इमारत विकली गेली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या लिलावात इमारतीची बेस प्राइस ५४ कोटींपर्यंत खाली आणण्यात आली होती. तरीही कोणी ही इमारत खरेदी करण्यात रस दाखवला नाही. मार्च महिन्यात या इमारतीसाठी नववा लिलाव झाला होता. यावेळी सॅटर्न रिअल्टर्सनं  बोली लावली होती. अखेर ५२.२५ कोटींना इमारतीचा सौदा झाला आहे. मूळ किंमतीपेक्षा एक तृतीयांश कमी किंमतीत ही इमारत विकली गेली आहे.

कर्ज वसुली लवादानं ही विक्री प्रक्रिया पार पाडली. विक्रीतून मिळालेले पैसे कर्जदारांना देण्यात येणार आहेत. विजय मल्ल्या याच्या नावावर असलेले समभाग विकून याआधीच ७२५० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

याआधी २६ जुलैला इंग्लंडमधील न्यायालयाने मल्ल्याला दिवाळखोर घोषीत करण्याचा निकाल दिला होता. इंग्लंडमधील न्यायालयाच्या या निकालामुळे भारतीय बॅंकांना मल्ल्याच्या जगभरातील मालमत्तांचा लिलाव करून थकित कर्जाची वसूली करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा