
मुंबईतील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 'मोगरा पंपिंग स्टेशन'च्या (Mogra Pumping Station) उभारणीचे काम, आवश्यक पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतर, 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
हा प्रकल्प प्रस्तावित केल्यापासून जवळपास दोन दशके उलटली आहेत. या भागांत पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या वारंवार उद्भवते.
या प्रकल्पामुळे वर्सोवा, अंधेरी आणि जोगेश्वरीच्या काही भागांतील पूर-संरक्षण व्यवस्था बळकट होण्याची अपेक्षा आहे.
ओशिवरा-लोकखंडवाला पट्ट्यातील मोगरा नाल्यालगत 393 कोटी रुपये खर्चाचे हे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे.
यात 'टायडल गेट्स' (भरती-ओहोटीच्या वेळी पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणारे दरवाजे), संरक्षक भिंती आणि पूरक पायाभूत सुविधांचा समावेश असेल.
हा प्रकल्प 2021 मध्ये मंजूर झाला होता आणि तो 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; परंतु जमीन संपादनातील अडचणी आणि प्रस्तावित जागा व 'वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड'चा दुसरा टप्पा (Phase 2) यांच्यातील संघर्षामुळे कामात विलंब झाला.
याचे प्राथमिक काम मार्च 2025 मध्ये सुरू झाले होते, परंतु त्यानंतर हे केंद्र 'लोकखंडवाला खाडी रस्त्या'च्या (Lokhandwala Creek Road) दिशेने हलवावे लागले.
त्यामुळे 'कोस्टल रेग्युलेशन झोन'ची (CRZ) नवीन मंजुरी आणि केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक ठरले.
एका वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आता सर्व आवश्यक पर्यावरणीय परवानग्या मिळाल्या असून, त्यामुळे बांधकामाला सुरुवात करता येणार आहे.
हे काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला असला, तरी महापालिका (brihanmumbai municipal corporation) प्रशासन 2029 पूर्वीच हे पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे.
मुंबईच्या 13,000 कोटी रुपयांच्या 'एकात्मिक पूर नियंत्रण कृती आराखड्या'चा (Integrated Flood Control Action Plan) हा एक महत्त्वाचा भाग आहे.
या आराखड्यांतर्गत पावसाळ्यातील पुराचा सामना करण्याची शहराची क्षमता वाढवण्यासाठी जलनिस्सारण यंत्रणा बळकट केली जात आहे.
यात पावसाळी पाण्याचे नाले (storm-water drains) रुंद करणे, पंपिंग यंत्रणा अद्ययावत करणे आणि मिठी नदीचे पुनरुज्जीवन करणे यांचा समावेश आहे.
तसेच निसर्गावर आधारित पूर-नियंत्रण उपाययोजनांचेही नियोजन केले जात आहे.
'लोकखंडवाला ओशिवरा सिटिझन्स असोसिएशन'चे सह-संस्थापक धवल शाह यांनी सांगितले की, या प्रकल्पाला "आधीच विलंब झाला आहे" आणि आता तो प्राधान्याने पूर्ण केला गेला पाहिजे.
लिंक रोड, वीरा देसाई रोड आणि अंधेरीतील सखल भाग यांसारख्या पूरप्रवण क्षेत्रांना या सुविधेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
नाल्यांमध्ये सोफे आणि इतर मोठ्या आकाराचा कचरा टाकल्यामुळे त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होत असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली.
भरतीच्या वेळी, जेव्हा पूर-नियंत्रण दरवाजे (फ्लडगेट्स) बंद केले जातात आणि पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या समुद्रात वाहून जाऊ शकत नाही, तेव्हा पंपिंग स्टेशन्स विशेषतः महत्त्वाची ठरतात.
मुंबईत इर्ला, हाजी अली, क्लीव्हलँड, लव्हग्रोव्ह, रे रोड-ब्रिटानिया आणि गजधर बंध यांसारख्या अनेक ठिकाणी अशा सुविधा आधीच कार्यान्वित आहेत.
मात्र, मोगरा आणि माहूल येथील प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत आलेल्या विनाशकारी पुरानंतर 'ब्रिमस्टोवॅड' (BRIMSTOWAD) अंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या पंपिंग प्रकल्पांमध्ये या दोन्ही प्रकल्पांचा समावेश होता.
हेही वाचा
