Advertisement

तीन वर्षांत गोरेगावात म्हाडाची 5 हजार घरे, यातील 2,855 घरे अत्यल्प गटासाठी


तीन वर्षांत गोरेगावात म्हाडाची 5 हजार घरे, यातील 2,855 घरे अत्यल्प गटासाठी
SHARES

गोरेगाव पहाडी येथे गृहयोजना राबवण्याच्या प्रक्रियेला अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने वेग दिला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात गोरेगाव पहाडी येथील 18 एकर परिसरात 5 हजार 119 घरांचे बांधकाम करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी मुंबई मंडळाने दिली आहे.


अत्यल्प गटालाही प्राधान्य

म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकडे अत्यल्प गटाचा मोठा कल असतो. पण गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या लॉटरीतील अत्यल्प गटासाठीच्या घरांचा आकडा कमी होत आहे. यंदा तर अत्यल्प गटातील घरे हे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी (केवळ 8) होती. त्यामुळे म्हाडाला सर्वसामान्यांच्या टिकेलाही सामोरे जावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेत गोरेगाव पहाडी गृहयोजनेत मुंबई मंडळाने अत्यल्प गटाला प्राधान्य देत याच गटासाठी सर्वाधिक घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच येथे 5119 घरांपैकी 2855 घरे ही केवळ अत्यल्प गटासाठी असणार आहेत हे विशेष.


प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा मानस

महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प पुढच्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचा मुंबई मंडळाचा मानस आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात ही 5 हजार 119 घरे लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची दाट शक्यता झाली आहे.

पहाडी गोरेगाव येथे म्हाडाच्या मालकीच्या 25 एकर जमिनीवर कुसूम शिंदे नामक महिलेने मालकी दावा दाखवला. त्यातून म्हाडाविरूद्ध कुसूम शिंदे असा वाद पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झाला आणि हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. दरम्यानच्या काळात कुसूम शिंदेने या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करत ही जमीन गुंदेचा बिल्डरला विकली. सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयात म्हाडाने बाजी मारत ही जमीन दोन वर्षांपूर्वी ताब्यात घेत पंचवीस वर्षांची ऐतिहासिक लढाई जिंकली.

आता याच जागेवर मुंबई मंडळाकडून 5 हजार 119 घरांचा प्रकल्प राबवण्यासाठी निविदा काढण्यात येत आहेत. दरम्यान मुंबई लाइव्हने काही दिवसांपूर्वी या जमिनीवर म्हाडाकडून 5 हजार घरे बांधण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम दिले होते. हे वृत्त अखेर खरे ठरले आहे.18 एकर जागेवर प्रकल्प राबवणार

मुंबई मंडळाच्या प्रस्तावानुसार 25 एकर जागेपैकी 18 एकर जागेवर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. 18 एकरवरील अ आणि ब अशा दोन भुखंडावर दोन टप्प्यात ही गृहयोजना राबवण्यात येणार आहे. 41,614 चौ. मीटरच्या अ भुखंडावर 2 हजार 950 घरे बांधण्यात येतील. यातील 1 हजार 665 घरे अत्यल्प गटासाठी, 555 घरे अल्प गटासाठी, 417 घरे मध्यम गटासाठी तर 313 घरे उच्च गटासाठी असणार आहेत.

29,740 चौ. मीटरच्या 'ब' भुखंडावर 2 हजार 109 घरे बांधण्यात येणार असून त्यातील 1 हजार 190 घरे अत्यल्प गटासाठी, 397 घरे अल्प गटासाठी, 298 घरे मध्यम गटासाठी आणि 224 घरे उच्च गटासाठी असणार आहेत.


अशी आहे गोरेगाव पहाडी गृहयोजना

  • 25 एकरचा भूखंड
  • 25 पैकी 18 एकरावर घरे
  • एकूण 5119 घरे
  • यापैकी अत्यल्प गटासाठी 2855 घरे
  • अल्प गटासाठी 952 घरे
  • मध्यम गटासाठी 775 घरे
  • उच्च गटासाठी 537 घरे
  • पुढील आठवड्यात घरांच्या बांधकामासाठी निविदा
  • पुढील काही महिन्यांत काम सुरू होण्याची शक्यता
  • काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा मुंबई मंडळाचा मानस
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा