
माध्यमांतील वृत्तांनुसार, या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मुंबईभर एकत्रित डिजिटल पार्किंग व्यवस्था तयार करण्याचा प्रस्ताव आहे. विशेष मोबाईल अॅप आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून वाहनचालकांना रिअल-टाइम पार्किंग उपलब्धता तपासता येईल, स्लॉट आगाऊ बुक करता येईल आणि ऑनलाइन पेमेंटही करता येणार आहे.
मुंबईत वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून पार्किंगची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या प्रति किलोमीटर जवळपास 2,300 वाहने आहेत. 2019 मध्ये ही संख्या सुमारे 1,840 होती, तर 2014 मध्ये ती सुमारे 1,150 इतकी होती. विशेष म्हणजे, 2025 या वर्षातच शहरात 3 लाखांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे.
सध्या BMC कडून मुंबईत 26 ऑफ-स्ट्रीट पार्किंग सुविधा चालवल्या जातात. प्रस्तावित स्मार्ट पार्किंग योजनेअंतर्गत महापालिकेच्या पार्किंग जागांसोबतच मॉल्स, व्यावसायिक संकुले आणि खासगी पार्किंग सुविधांनाही या डिजिटल नेटवर्कमध्ये जोडण्याचा विचार आहे.
याशिवाय, गृहनिर्माण संस्थांमधील दिवसाच्या वेळेत रिकाम्या असणाऱ्या पार्किंग स्लॉट्स सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्याचाही विचार सुरू आहे.
Nextkraft Parking Technologies चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष मजिठिया (Ashish Majithia) यांनी या उपक्रमाचे स्वागत करत म्हटले की, “मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरासाठी स्मार्ट पार्किंग प्रणाली ही अत्यंत आवश्यक आणि सकारात्मक पाऊल आहे. रिअल-टाइम उपलब्धता आणि आगाऊ बुकिंगमुळे वाहनांची अनावश्यक वर्दळ, वाहतूक कोंडी, इंधनाची नासाडी आणि प्रवाशांचा ताण कमी होऊ शकतो.”
मात्र त्यांनी स्पष्ट केले की, केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसून बहुमजली आणि मेकॅनाइज्ड पार्किंग सुविधांचीही मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.
तसेच City Lift India Limited चे संचालक नवीन राजागोपालन (Naveen Rajagopalan) यांनी सांगितले की, “डिजिटल पार्किंग व्यवस्थापन ही भविष्यातील गरज आहे. मात्र, वाढत्या वाहनसंख्येला तोंड देण्यासाठी ऑटोमेटेड आणि व्हर्टिकल पार्किंगसारख्या आधुनिक सुविधांची उभारणीही तितकीच महत्त्वाची आहे.”
महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, पार्किंग शोधण्यासाठी वाहनांची होणारी अनावश्यक फेरी कमी झाल्यास व्यापारी भागांतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
ही स्मार्ट पार्किंग प्रणाली पुढील एका वर्षात विकसित केली जाणार असून दक्षिण मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील पाच महापालिका विभागांमध्ये पायलट प्रकल्प राबवण्याची योजना आहे.
दरम्यान, महापालिका पार्किंग शुल्कात वाढ करण्याचाही विचार करत आहे. पार्किंग शुल्कात 40 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांनी मंजूर केला आहे. पुढील प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.
तज्ज्ञांच्या मते, स्मार्ट पार्किंग व्यवस्थेमुळे सुविधा आणि कार्यक्षमता वाढू शकते. मात्र, मुंबईच्या पार्किंग समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे, स्मार्ट मोबिलिटी नियोजन आणि मोठ्या प्रमाणावर संरचित पार्किंग सुविधा उभारणे अत्यावश्यक राहणार आहे.
हेही वाचा
