Advertisement

सैफी बुऱ्हाणी ट्रस्टही दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यास उत्सुक


सैफी बुऱ्हाणी ट्रस्टही दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यास उत्सुक
SHARES

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जप्त करण्यात आलेल्या भेंडी बाजार, माझगाव आणि औरंगाबादमधील मालमत्तेचा मंगळवारी लिलाव होणार आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी स्वामी यांनी भेंडी बाजारातील हॉटेलची जागा खरेदी करत तिथे एक भव्य शौचालय बांधण्याची घोषणा करत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे हा लिलाव चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. असे असताना लिलावास काही तासच उरले असताना भेंडीबाजार येथील दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यासाठी सैफी बुऱ्हाणी ट्रस्टही उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंगळवारी भेंडीबाजारची मालमत्ता नक्की कोण खरेदी करते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबर्स येथे लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरम्यान याआधीही अर्थ मंत्रालयाकडून लिलावाचा प्रयत्न करण्यात आला पण तो अपयशी ठरला होता. आता नव्याने करण्यात येणाऱ्या लिलावात भेंडीबाजार येथील शबनम गेस्ट हाऊस (सीएस नंबर 4334) याकुब स्ट्रीट, पाकमोडिया स्ट्रीट, डामरवाला इमारत, खोली क्रमांक 18-20,25-26 आणि 28 तसेच पाकमोडिया स्ट्रीटवरीलच रौणाक अफरोज हॉटेल या तीन मालमत्त्यांसह औरंगाबाद आणि माझगावमधील मालमत्तांचाही लिलाव होणार आहे.

शबनम गेस्ट हाऊससाठी 1 कोटी 21 लाख 43 हजार, पाकमोडिया स्ट्रीटसाठी 1 कोटी 55 लाख 76 हजार तर रौणाक अफरोज हॉटेलसाठी 1 कोटी 18 लाख 63 हजार अशी किंमत अर्थात बोली ठरवण्यात आली आहे.

भेंडीबाजार परिसराचा समूह पुनर्विकास सैफी बुऱ्हाणी ट्रस्टकडून केला जात आहे. ज्या परिसरातील ज्या इमारतींचा पुनर्विकास सैफी बुऱ्हाणी करत आहे त्या परिसरातच दाऊदची ही मालमत्ता आहे. त्यामुळे ही मालमत्ता खरेदी करत या मालमत्तेचा पुनर्विकासात समावेश करण्याचा बुऱ्हाणी ट्रस्टचा मानस आहे. त्यामुळेच बुऱ्हाणी ट्रस्टने भेंडीबाजारमधील दाऊदची मालमत्ता खरेदीसाठी पुढाकार घेत त्यासाठी निविदा भरली आहे. आता कोण कोण ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी पुढे आले आहेत आणि नेमके मंगळवारी कोण बाजी मारते, पुनर्विकासातून तिथे टॉवर उभे राहते की शौचालय हे आता मंगळवारीच समजेल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा