Advertisement

जे. जे. हॉस्पिटलचा संघ उपांत्य फेरीत


जे. जे. हॉस्पिटलचा संघ उपांत्य फेरीत
SHARES

अणुशक्ती क्रीडा नगरमध्ये बुधवारी पार पडलेल्या 'ऑल इंडिया इंटर इन्स्टिट्युशनल कबड्डी' स्पर्धेत राजेश शिवतरकरच्या अष्टपैलू खेळामुळे जे. जे. हॉस्पिटल संघाने मुंबई महापालिकेचा 22 गुणांनी पराभव करुन उपांत्य फेरीत धडक मारली. तर, अन्य साखळी सामन्यात बी. इ. जी. पुणे संघाने डी. ए. इ. मुंबई संघावर 23 गुणांनी आणि एम. एस. ई. बी. संघाने इंडियन आर्मीवर 14 गुणांनी विजय मिळविला.

अष्टपैलू राजेश शिवतरकरने केलेल्या चढाई व पकडीच्या जोरावर जे. जे. हॉस्पिटल संघाने मुंबई महापालिका संघाला उत्तरार्धात चांगलेच पाणी पाजले. पहिल्या डावात 12-11 अशी आघाडी घेणाऱ्या जे. जे. हॉस्पिटल संघाने अखेर हा सामना 41-19 असा मोठ्या फरकाने जिंकला.

तसेच बी. इ. जी. पुणे संघ आणि डी. ए. इ. मुंबई संघात झालेल्या सामन्यात पुणे संघाने मध्यांतरालाच 22-3 अशी मोठी आघाडी घेत विजयाचा मार्ग सुकर केला. चढाईपटू सुदन व बचावपटू मोहित मल्लिक यांनी बी. इ. जी. पुणे संघाला 34-11 असा विजय मिळवून दिला.

याचप्रमाणे एम. एस. ई. बी. संघाने भक्कम आघाडी राखत इंडियन आर्मी संघावर 35-21 अशी मात करून मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का दिला. एम. एस. ई. बी. संघाच्या विजयात चढाईपटू नितीन देशमुख व अजय शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. प्रो कबड्डीपटू मोनू गोयलने पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तो एकटा या प्रयत्नात कमी पडला.

बाद फेरीत पात्र ठरलेल्या संघांमध्ये इंडियन आर्मी विरुद्ध जे. जे. हॉस्पिटल आणि बी. इ. जी. पुणे विरुद्ध एम. एस. ई. बी. अशा उपांत्य लढती होतील.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा