महिंद्रा आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण 'साहेब चषका'चे मानकरी

 Lower Parel
महिंद्रा आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण 'साहेब चषका'चे मानकरी

शिवशक्ती महिला मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिंद्राने व्यावसायिक पुरुष गटात तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने व्यावसायिक महिला गटात अंतिम विजेतेपद पटकावले. युनियन बॅँकेचा अजिंक्य कापरे पुरुष गटात,तर देना बॅँकेची पूजा यादव महिला गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोघांनाही प्रत्येकी रोख रु. दहा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य तसेच मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना मैदानावर संपन्न झालेल्या व्यावसायिक महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने अपेक्षेप्रमाणे देना बॅँकेचा प्रतिकार 27-13 असा सहज मोडून काढत पंचवीस हजार आणि "साहेब" चषकाला गवसणी घातली. उपविजेत्या बॅँकेला चषक व रोख पंधरा हजारावर समाधान मानावे लागले. सुरुवातीपासून आक्रमकतेवर भर देत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण संघाने भराभर गुण घेण्याचा सपाटा लावत मध्यांतरालाच 13-07 अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली. उत्तरार्धात त्यात आणखी 14 गुणांची भर टाकत सामना लीलया आपल्या नावे केला. कोमल देवकर,हर्षला मोरे यांच्या धारदार चढाया आणि राणी उपहार, तेजश्री सारंग यांच्या भक्कम पकडी यामुळेच त्यांनी हा विजय साकारला.

व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने युनियन बँकेला 30-24 असे पराभूत करीत रोख रु.पन्नास हजार व "साहेब" चषकावर आपले नाव कोरले. मध्यांतराला 18-08 अशी आश्वासक आघाडी घेणाऱ्या महिंद्राने नंतर मात्र सावध आणि सयंमाने खेळ करीत सामना आपल्या बाजूने झुकविला. ओमकार जाधव, आनंद पाटील यांच्या पल्लेदार चढाया आणि स्वप्नील शिंदे, ऋतुराज कोरवी यांच्या पकडीचा खेळ या सामन्यात उठावदार झाला. युनियन बँकेकडून अजिंक्य कापरे, सुशांत साईल, नितीन गोगटे यांनी कडवी लढत दिली. 

महिंद्राच्या ओमकार जाधव आणि स्वप्नील शिंदे यांना स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. दोघांना प्रत्येकी रोख रु.पाच हजार देऊन सन्मानित करण्यात आले. उपांत्य सामन्यात महिंद्राने महाराष्ट्र पोलीसांना 27-14 तर युनियन बँकेने आयकर-पुणे ला 41-22 असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु. दहा हजार व चषक प्रदान करण्यात आला.

Loading Comments