मुंबईच्या महिला-पुरुष संघाची पुणे कबड्डी स्पर्धेत आगेकूच

 Mumbai
मुंबईच्या महिला-पुरुष संघाची पुणे कबड्डी स्पर्धेत आगेकूच

पुणे येथील बाबुराव सणस क्रीडांगणावर सुरू असलेल्या व्यावसायिक पुरूष आणि महिला कबड्डी स्पर्धेत मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाने बीईजी संघावर 35-17 असा विजय मिळवला. मध्यंतराला मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाकडे 17-9 अशी आघाडी होती. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या शुभम कुंभार आणि शिवराज जाधव यांनी आक्रमक खेळ करत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. त्यांना संकेत सावंतने काही महत्त्वाच्या पकडी घेत चांगली साथ दिली. बीईजीच्या विवेक घुले आणि सुशील कुमार यांनी चांगला खेळ केला.

तसेच महिला विभागात मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी संघाने साताऱ्याच्या शिवाजी उदय मंडळ संघाचा 45-21 असा धुव्वा उडवत एकहाती विजय मिळवला. मध्यंतराला महात्मा गांधी संघाकडे 23-8 अशी भक्कम आघाडी होती. महात्मा गांधी संघाला सायली जाधवने केलेली अष्टपैलू उत्कृष्ट खेळी आणि प्रियंका कुंभार, तेजस्विनी पाटेकर यांनी घेतलेल्या उत्कृष्ट पकडींच्या जोरावर विजय मिळवता आला. शिवाजी उदय मंडळाच्या सोनाली दळवी आणि श्रीवणी गोसावीने केलेल्या जोरदार चढाया यासह अपूर्वा शिंदे आणि नेनिका भोई यांनी घेतलेल्या पकडींमुळे मध्यंतरानंतर काहीशी चुरस निर्माण केली होती. मात्र संघाच्या विजयासाठी त्यांचे हे प्रयत्न अपुरे ठरले.

Loading Comments