Advertisement

वास्तववादी सिनेमासाठी अभिनेत्री बनली निर्माती


वास्तववादी सिनेमासाठी अभिनेत्री बनली निर्माती
SHARES

एखाद्या सिनेमाचा विषय जेव्हा आवडतो, तेव्हा तो सिनेमा पूर्ण करण्यासाठी कलाकारही वाट्टेल ते करायला तयार होतात हे यापूर्वीही अनेकदा पाहिलं आहे. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘बे एके बे’ हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी अभिनेत्री पूर्णिमा वाव्हळ-यादव ही आता निर्माती बनली आहे.


यूएसमध्ये नॉमिनेट

पूर्णिमाबाबत सांगायचं तर तिने यापूर्वी काही महत्त्वाच्या सिनेमांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. यात अरुण नलावडेंसोबत ‘माझी शाळा’, भरत जाधवसोबत ‘एक कुतुब तीन मीनार’, किशोर कदम यांच्यासोबत ‘भाकर’ अशा काही सिनेमांचा समावेष आहे. ‘भाकर’ या सिनेमासाठी २०१६ मध्ये पूर्णिमाला यूएसमध्ये नॉमिनेटही करण्यात आलं होतं.


निर्मितीकडे वळण्याबाबत ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना पूर्णिमा म्हणाली, ‘बे एके बे’ची कन्सेप्टच वेगळी आहे. मुलांना मुलांच्या कलेनं शिकवणं हा ‘बे एके बे’चा गाभा आहे. विषय खूप आवडल्यामुळे या सिनेमाद्वारे निर्मिती क्षेत्रात का उतरू नये? असा विचार केला. गाण्यांच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याची अनोखी पद्धत या सिनेमात आहे.


'तर मुलांवरील भार कमी होईल'

आज अभ्यासक्रम कसा शिकवला जातो हे आपण पाहतो आहोच, पण तेच गाण्यांच्या माध्यमातून शिकवलं गेलं, तर ते सहज त्यांच्या लक्षात राहतं. त्यामुळे गाण्यांतून अभ्यासक्रम शिकवला, तर किती बरं होईल. काही शाळांमध्ये असा अभ्यासक्रम सुरूही करण्यात आला आहे. सगळीकडेच असं झालं तर मुलांवरील भार खूप कमी होईल.


'त्यामुळे निर्मितीकडे वळले'

आम्ही शिक्षणपद्धती बदलायला निघालो आहोत असं मुळीच नाही, पण जर अशा प्रकारे शिकवलं गेलं तर ते कसं सोयीस्कर होईल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निर्मिती करण्याचा विचार केला. पण हे काम अभिनयाएवढं सोपं नव्हतं. बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही इथवर पोहोचलो.


'मग मीच पुढाकार घेतला'

विषय जेव्हा निवडला, तेव्हा जवळजवळ शंभर जणांशी भेटी गाठी केल्या होत्या, पण कोणीही ठोस होकार दिला नाही. वेळकाढूपणा केला जात होता. त्यांना वास्तव परिस्थितीतील दाहकता मांडण्यात रुची नव्हती, मसालेदार सिनेमा बनवायचा होता. त्यात आयटम साँग हवं होतं. हे सर्व या सिनेमात नाही. त्यामुळे मग मीच पुढाकार घेतला.

यासोबतच मी नायकाच्या बहिणीची भूमिकाही साकारली आहे. ‘मानवसेवा हीच इश्वरभक्ती’ असं म्हणत ती आपल्या भावालाही तेच करायला शिकवते. शहरामध्ये प्रोफेसर बनून पैसे कमावण्यापेक्षा खेडोपाडी जाऊन गोरगरीबांच्या मुलांना शिकवण्याचा सल्ला देते. बहिणीचा सल्ला ऐकून नायकही दुर्गम भागात जाऊन ज्ञानदानाचं कार्य करतो.


'या' कलाकारांच्या भूमिका

पूर्णिमाच्या साथीने विकास भगेरीया यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्सच्या बॅनरखाली ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात पूर्णिमासोबत संजय खापरे, जयवंत वाडकर, संचित यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे, अरुण नलावडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा