• अभिनेता संतोष मयेकरचं आकस्मिक निधन
SHARE

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘दशक्रिया’ या चित्रपटासोबतच ‘वस्त्रहरण’सारख्या विक्रमी नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेता संतोष मयेकर (५२) यांचं आकस्मिक निधन झालं. सायंकाळी अंधेरी येथील राहत्या घरी संतोष यांना झोपेतच हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही वर्षांपासून संतोषला मधुमेहाचा त्रास होता. संतोषच्या पश्चात पत्नी प्रीती आहे.

santosh mayekar 2.jpeg

रंगभूमीवर दणक्यात पुनरागमन

लोअर परळ येथील लहानशा खोलीत जन्मापासूनचं आयुष्य घालवणाऱ्या संतोष यांचा प्रीतीसोबत विवाह झाला आणि ते अंधेरीला राहायला गेले. मध्यंतरीच्या काळात प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी अभिनयातून ब्रेकही घेतला होता. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने ‘दोन बायका चावट ऐका’ या नाटकाद्वारे संतोष यांनी रंगभूमीवर दणक्यात पुनरागमन केलं होतं.


नाटकातही केलं काम

दिवंगत अभिनेते मच्छिंद्र कांबळी उर्फ बाबूजी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनच्या काही नाटकांमध्ये संतोष यांनी अभिनय केला होता. यात ‘वस्त्रहरण’ (तात्या सरपंच), ‘भैय्या हातपाय पसरी’ यांसारख्या नाटकांचा समावेश आहे. 'आॅल दी बेस्ट' या नाटकाच्या नव्या संचात संतोष यांनी बहिऱ्याच्या भूमिका साकारली होती.

याखेरीज ‘दोन बायका चावट ऐका’ या नाटकातही संतोष यांनी काम केलं होतं. संतोष कोचरेकरांच्या ‘नामदेव म्हणे’ या नाटकात संतोष यांनी साकारलेल्या इन्स्पेक्टर, शेजारी, काका, दुकानदार या चार व्यक्तिरेखांना रसिकांना भरभरून दाद दिली होती.


'या' सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एंट्री

‘देवा शपथ खोटं सांगेन’ या सिनेमाद्वारे संतोष यांनी मोठ्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर ‘चष्मे बहाद्दूर’, ‘गलगले निघाले’, ‘सातबारा कसा बदलला’, ‘सत्य सावित्री आणि सत्यवान’, ‘लक्ष्मी तुझ्याविना’, ‘आयपीएल - इंडियन प्रेमाचा लफडा’ आणि ‘आर्त’ या सिनेमांमध्ये संतोष यांनी विनोदी भूमिकांसोबतच खलनायकी छटा असलेल्या व्यक्तिरेखाही साकारल्या. संतोष यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीसोबतच चित्रपटसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या