Advertisement

वडील गाॅडफादर असूनही स्वकर्तृत्वाने मुलीने शोधला निर्माता


वडील गाॅडफादर असूनही स्वकर्तृत्वाने मुलीने शोधला निर्माता
SHARES

सिनेमा बनवण्याची कला जरी अंगी असली तरी कित्येकांना आपले गुण दाखवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो, पण एखाद्या बड्या निर्मात्याच्या मुलीने जर स्वकर्तृत्वाच्या बळावर निर्माता शोधून सिनेमा तयार केला तर तिच्या जिद्दीचं कौतुक करावंच लागेल. नितीन केणी हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. असं असलं तरी त्यांची मुलगी नितिशाने जेव्हा सिनेमाचं दिग्दर्शन करायचं ठरवलं, तेव्हा स्वत: स्ट्रगल करून निर्माता शोधला. निशिताच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘बोगदा’ हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने केलेला स्ट्रगल निशिताने ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना शेअर केला.


व्हिस्लींग वुड्सची विद्यार्थिनी

१२ वी नंतर मी सुभाष घईंच्या व्हिस्लिंग वुड्समध्ये तीन वर्षांचा बॅचलर प्रोग्राम केला. त्यात डिरेक्शनमध्ये स्पेशलायझेशन केलं. तिथे शाॅर्टफिल्म्स करायचे. न्यूयाॅर्कमध्ये जाऊन मी न्यूयाॅर्क फिल्म अॅकॅडमीमध्ये एक वर्कशॅाप केलं होतं. तिथे स्क्रीप्ट रायटिंग शिकले. तिथे असतानाच ‘बोगदा’ या सिनेमाच्या विषयावर विचार करणं सुरू केलं होतं. नंतर भारतात परतल्यावर त्यावर पटकथा लिहिली, पण तिथे असताना मी जी पटकथा लिहिली ती हिंदीसाठी ठेवली आहे.


स्वत:ला सिद्ध करायचं होतं

करण कोंडे हे देखील या सिनेमाचे निर्माते आहेत. आम्हाला या सिनेमासाठी बाहेरून फंडिंग घ्यायचं होतं. यातून स्वत:ला सिद्ध करायचं होतंच, पण त्यासोबतच स्ट्रगल काय असतो तेही जाणून घ्यायचं होतं. पहिल्याच सिनेमात हा अनुभव घ्यायचा होता. कारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिनेमात हा अनुभव कधीच मिळाला नसता, म्हणून आम्ही स्वत: निर्माते शोधण्यासाठी बाहेर पडलो.


बऱ्याच निर्मात्यांना भेटले

या सिनेमाच्या निर्मितीसाठी आम्ही खूप लोकांना भेटलो. जवळजवळ २० ते २५ निर्मात्यांची भेट घेतली. सुरुवातीला सर्व हो म्हणायचे, पण नंतर नकार द्यायचे. या सर्व प्रवासात मी माझं आडनाव कधीच सांगितलं नाही. सिनेमाची कथा वेगळी होती. त्यातच माझं पहिलंच दिग्दर्शन म्हणून कोणीही धजावत नव्हतं.


त्यांना मसाला हवा होता

मी ज्या-ज्या निर्मात्यांना भेटले त्यांना गंभीर विषयावरील सिनेमाची निर्मिती करायची नव्हती. त्यांना मसालापट हवा होता. हा एक स्त्रीप्रधान सिनेमा आहे. त्यांना सिनेमात हिरो हवा होता. या सिनेमाचा नायकसुद्धा सेकंड हाफमध्ये येतो. तो सुद्धा नवीन आहे. त्यामुळे किती कलेक्शन होईल हे निर्मात्यांना जाणून घ्यायचं होतं, पण सिनेमा बनवण्यापूर्वी कलेक्शनबद्दल कोणीही सांगू शकत नाही. एकूणच प्रत्येकाचे विचार खूप वेगळे होते.


अखेर पानमंद यांची भेट

अखेर सुरेश पानमंद आणि नंदा पानमंद यांच्या सहकार्यामुळे ‘बोगदा’चा प्रवास सुरू झाला. आमचे प्रोड्युसर्स एका वेगळ्या व्यवसायात आहेत. त्यांना निर्माता बनण्यासाठी सर्व गोष्टी पटवून द्यायलाही खूप वेळ लागला. त्यांना या व्यवसायातील काहीच ठाऊक नाही. त्यामुळे आम्हाला सहा महिने लागले. मी प्रथमच सिनेमा करतेय. सर्व टिमच नवीन आहे. त्यामुळे हा आम्हा सर्वांचाच स्ट्रगल होता.


पप्पांनाही आनंद झाला

आम्ही स्वबळावर निर्माते शोधल्याने पप्पांनाही खूप आनंद झाला. त्यांनी या सिनेमाच्या प्रस्तुतीसाठी पुढाकार घेतला आहे. 'पॅनारोमा स्टुडिओ'च्या रूपात डिस्ट्रीब्युटरही भेटले. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्याचा प्रश्न आपोआपच सुटला.


भावनिक ऋणानुबंध

सुहासिनी जोशी, मृण्मयी देशपांडे आणि रोहित कोकाटे यांच्या या सिनेमात भूमिका आहेत. हा सिनेमा आई-मुलीच्या नात्यातील भावनिक ऋणानुबंध जपणारा आहे. आईचं आजारपण आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा यांमध्ये गुरफटलेली एक गरीब सामान्य मुलगी आणि आजाराला कंटाळून मुलीकडे मरणाची केविलवाणी मागणी करणारी आई या सिनेमात आहे. जन्म आणि मृत्यू या जीवनातील दोन अटळ घटकांवर हा सिनेमाचा सिनेमा भाष्य करतो.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा