Advertisement

गिरीश कुलकर्णीचा ‘तोडफोड...’ अंदाज!


गिरीश कुलकर्णीचा ‘तोडफोड...’ अंदाज!
SHARES

मराठमोळा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता गिरीश कुलकर्णी सध्या भलत्याच रंगात दिसतोय. ‘सेक्रेड गेम्स’ या बहुचर्चित हिंदी वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा गिरीश ‘फन्ने खान’मध्येही ऐश्वर्या राय-बच्चनसोबत एका वेगळ्याच स्टाइलमध्ये दिसला होता. आता ‘बॅाइज २’ या आगामी मराठी सिनेमात प्रेक्षकांना गिरीशचा ‘तोडफोड...’ अंदाज पाहायला मिळणार आहे.


‘बॉईज’ या गाजलेल्या मराठी सिनेमाचा सिक्वेल असलेल्या ‘बॉईज २’ या सिनेमातही गिरीश एका वेगळ्या ढंगात आणि रंगात दिसणार आहे. ‘फास्टर फेणे’मध्ये त्याच्या विलक्षण हास्यासोबतच्या अभिनयाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ‘बॉईज २’मध्ये त्याच्या वाट्याला असेच काहीसे मिश्किल संवाद आल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. याखेरीज या सिनेमात गिरीशवर एक गाणंही चित्रीत करण्यात आलं आहे.


‘बॉईज’ सिनेमातलं आयटम साँग आठवलं की, सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला...’ या सनीच्या रिमिक्स लावणीनं गतवर्षीच्या ‘बॉईज’ला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती. ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘बॉईज २’मध्येही एक आयटम साँग आहे. या गाण्यातच गिरीशचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.


सोनेरी गिरीश

वाढदिवसावर आधारित असलेल्या या ‘तोडफोड...’ साँगमध्ये सुवर्णा काळेचा आयटम नंबर आहे. गिरीशला ताल धरायला लावणारं उडत्या लयीचं हे गाणं तरुणाईचे पाय थिरकवण्यासही यशस्वी ठरेल. या गाण्यात सोनेरी गिरीश पाहायला मिळतो. सोनेरी अशासाठी की त्याने सोन्याचे खूपसे दागिने घातलेले आहेत. हेही नसे थोडके म्हणत त्याने सोनेरी शर्ट आणि पँट परिधान केलेली आहे. त्यामुळे एका दृष्टिकोनातून यात गिरीशचं सोनेरी रुपडंही पाहायला मिळेल.

शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केलं असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा