Advertisement

फिल्म रिव्ह्यू - येवा कोंकण 'रेडू'चो असा!


फिल्म रिव्ह्यू - येवा कोंकण 'रेडू'चो असा!
SHARES

एखाद्या नवीन शोध लागलेल्या वस्तूचं आपल्याला खूप अप्रूप असतं. ती वस्तू कशी असेल? ती आपल्याकडेही असावी यासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार होतो? अशीच अवस्था झाली ज्या दिवशी रेडू म्हणजेच रेडिओचा शोध लागला आणि प्रत्येकालाच 'रेडू'चं खूप कौतुक वाटायला लागलं. रेडू हा चित्रपट यावरच आधारीत आहे. कोकणात घडलेली ही गोष्ट मनात खोलवर घर करून राहते.

कोकणात तातू (शशांक शेंडे) आणि त्याची बायको छाया (छाया कदम) मोलमजुरी करून  दिवस काढत असतात. गावात श्रीमंताच्या घरी 'रेडू' येतो. असा एखादा रेडू आपल्या घरीही असावा अशी इच्छा तात्याची असते. आतापर्यंत तात्या केवळ रेडूबद्दल ऐकून असतो. मात्र, रेडू बघितल्यावर तो तात्याला आवडायला लागतो. अशातच छायाची मुंबईला पळून गेलेली बहीण सुमना (गौरी कोंगे) आपल्या नवऱ्याला बबनला (विनम बाभल) घेऊन गावात येते. यावेळी बबनने स्वत:बरोबर रेडू आणलेला असतो.




आपल्या घरात रेडू आला म्हणून तात्या ही खूष होतो. तो जाईल तिथे प्रत्येक ठिकाणी रेडूला बरोबर घेऊन जातो. आपल्यापेक्षा तो रेडूला जास्त जपतो. त्यानंतर सुमन पुन्हा मुंबईला जायला निघते. यावेळी बबन आपला रेडू तात्याला गिफ्ट म्हणून देतो. यावेळी तात्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण एक दिवस तात्याचा रेडू चोरीला जातो. रेडूला परत मिळवण्यासाठी तात्या वाट्टेल ते करायला तयार असतो. आता रेडूला परत मिळवण्यासाठी तात्या काय करणार? त्याला रेडू परत मिळणार की नाही? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला रेडू बघावाच लागेल.

रेडू ही एक साधी सरळ कथा आहे. तात्याचं रेडूवरचं प्रेम अतिशय सोप्या पद्धतीने दिग्दर्शक सागर वंजारी यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहचवलं आहे. रेडिओचा शोध लागला तो काळ अतिशय सुंदर पद्धतीने प्रेक्षकांसमोर उभा राहतो. याचं श्रेय दिग्दर्शकालाच जातं. त्यावेळचं कोकण, कोकणातील लोकांचं राहणीमान, भाषा, रेडूबद्दल असलेलं कुतूहल मांडण्यात दिग्दर्शकाने कोणतीच कसर सोडलेली नाही.

त्याचप्रमाणे चित्रपटातील गाणीही उत्तम जमली आहेत. मात्र, गाण्यालाही त्या काळचा टच असता, तर ती चित्रपटाच्या काळाशी मिळती जुळती वाटली असती.




रेडूमध्ये छाया कदम, शशांक शेंडे हे प्रमुख भूमिकेत आहेत. या दोघांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. पहिल्यांदा रेडू बघितल्यानंतरचा शशांक शेंडे यांचा बदलेला चेहरा त्यांचे रेडू बद्दलचे प्रेम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. शशांक शेंडे यांना छाया कदम यांनी छान साथ दिली आहे. त्याचबरोबर छायाच्या बहिणीच्या भूमिकेत असणारी गौरी कोंगे हिनेही सुमन उत्तम साकारली आहे.

चित्रपटाची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा खरा उद्देश हा चित्रपटाच्या शेवटी आहे. चित्रपटाचा शेवट तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. तुम्हाला जर एक उत्तम कथा, कोकणाचं सौंदर्य आणि दर्जेदार अभिनय बघायचा असेल, तर रेडू बघायलाच हवा!



Movie - Redu

Actors - Shashank Shende, Chhaya Kadam, Gauri Konge, Vinamra Bhabal, Mrunmayee Supal


Ratings - 3/5


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा