Advertisement

न्यूड...एका संघर्षाची कहाणी!


न्यूड...एका संघर्षाची कहाणी!
SHARES

कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासासाठी न्यूड मॉडेलची गरज असते. मात्र हे काम करायला कोणी तयार होत नाही आणि झालंच, तर त्यांच्याकडे बघण्याचा घरच्यांचा, समाजाचा दृष्टीकोन कसा होतो? यावर 'न्यूड' हा चित्रपट भाष्य करतो. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष यात रेखाटलेला आहे. चौकटीबाहेरचा विषय हातळताना त्या विषयाचा किती अभ्यास करावा लागतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'न्यूड' हा चित्रपट!



यमुना (कल्याणी मुळे) या गावात राहणाऱ्या मुलीचा आपल्या जगण्यासाठी केलेला संघर्ष चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासून प्रेक्षकांसमोर येतो. गावातील एका मुलीच्या नादी लागलेल्या आपल्या नवऱ्याला सोडून यमुना आपल्या मुलाला लहान्याला (मदन देवधर) घेऊन मुंबईत येते. मुंबईत तीची मावशी चंद्राक्का (छाया कदम) रहात असते. मुलाला खूप शिवकण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत अलेल्या यमुनेला नोकरीची गरज असते. 

यमुनाची अाक्का जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम करत असते. यमुनाही आपल्या मुलासाठी न्यूड मॉडेल म्हणून काम करायला तयार होते. मात्र आपण जे काम करतोय ते ती कायम मुलापासून लपवत असते आणि याचा परिणाम पुढे चित्रपटात येतो. लहान्याला आपली आई काय काम करते ते कळल्यावर लहान्याची काय प्रतिक्रिया असेल? यमुना त्या नंतर हे काम करणार की नाही करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला न्यूड बघितल्यानंतरच मिळणार आहेत.



न्यूड चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासूनच तुम्ही चित्रपाटात गुंतत जाता. चित्रपटातील सुरूवातीच्या काही दृष्यांतून गावातील राहणीमान उत्तमरीत्या तुमच्यासमोर येतं. त्याचप्रमाणे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील चित्रकलेचा वर्ग, मुंबईतील अाक्काचं झोपडपट्टीतलं राहणीमान, अगदी प्रत्येक वेळी न्यूड मॉडेलचं चित्र रेखाटताना घेतलेले प्रसंग हे चित्रपटाचे युएसपी आहेत. त्याचप्रामणे चित्रपट थोडा लांबला असं वाटत असलं, तरी मध्यंतरानंतरचे अनके प्रसंग चित्रपटातील वेगळे कंगोरे प्रेक्षकांसमोर आणतात.



या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे. स्वत: लिहिलेली कथा असल्याचा फायदा रवी जाधव यांना चित्रपटाचं दिग्दर्शन करताना झालेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. चित्रपटाची कथा ही सध्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी या मॉडेलवर आधारीत आहे. लक्ष्मी न्यूड मॉडेल कशी झाली? तिने घरांच्यापासून आपलं काम कशाप्रकारे लपवलं? याचं दर्शन न्यूड मधून घडतं. न्यूड चित्रपटात यमुना लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते.



नेमकं चित्रपटात काय दाखवायचं? काय नाही दाखवायचं? या संकल्पना स्पष्ट असल्यामुळे समोर न्यूड मॉडेल असताना देखील कधीही किळसवाणं वाटत नाही. चित्रपटात अनेक प्रसंगांमध्ये झालेला पाण्याचा वापर हा चित्रपटाच्या विषयाची खोली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. त्याचप्रमाणे बाईच्या कपाळावरील कुंकवाचं महत्त्व अनेक प्रसंगांमध्ये चांगल्या प्रकारे अधोरेखीत झालं आहे. "कपडा जिस्म पें पहनाया जाता है, रूह पे नहीं, और में अपने काम में रूह खोजने की कोशिश करता हूँ|" हे अभिनेता नसिरूद्दीन शाह यांच्या तोंडी असणारं वाक्य नक्कीच तुम्हाला प्रेक्षक म्हणून विचार करायला भाग पाडतं.



चित्रपटात सगळ्यांचीच कामं उत्तम झाली आहेत. पण लक्षात राहते ती यमुना आणि अाक्का. या दोघींनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. कल्याणीचा अभिनय बघून आपल्याला खऱ्या आयुष्यात न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या महिलांच्या आयुष्याची कल्पना येते. तर आपल्या नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर न्यूड मॉडेल म्हणून काम करणारी खंबीर अाक्का बघताना नकळत डोळ्यात पाणी येतं. त्याचप्रमाणे लहान्या आणि जयराम (ओम भुतकर) यांच्याही भूमिका आपली छाप सोडून जातात.



चित्रपटातलं पार्श्वसंगीत आणि गाणी चित्रपट संपल्यानंतरही मनात घोळत राहतात. चित्रपटातील सायली खरे हिने गायलेल्या 'दिस येती, दिस जाती' या गाण्यातून चित्रपटाचा विषय प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचतो. त्याचप्रमाणे यमुना जेव्हा पहिल्यांदा न्यूड मॉडेल म्हणून विद्यार्थ्यांसमोर बसते, त्यावेळी दिलेले पार्श्वसंगीत यमुनाच्या मनात सुरू असलेली तळमळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.

एकंदरीत 'न्यूड' चित्रपट बघणं ही प्रेक्षकांसाठी एक प्रकारे पर्वणीच ठरणार आहे. एक चाकोरीबाहेरचा विषय आणि त्याला लाभलेलं उत्तम दिग्दर्शन यामुळे न्यूड चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करणारा आहे.



Movie - Nude

Actors - Kalyani Mulye, Chhaya kadam, Madan Deodhar, Om Bhutkar

Ratings - 4/5


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा