Advertisement

आज गोकुळात रंग खेळतो हरी...

सिनेरसिकांप्रमाणं रुपेरी पडद्यानंही कायम सणांचा आनंद लुटला आहे. त्यातल्या त्यात मराठी सिनेमानं नेहमी मराठमोळे सण साजरे करत त्यातील गीत-संगीतानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. गोकुळाष्टमीचा सणही मराठी सिनेमांनी मोठ्या भक्ती भावानं साजरा केला आहे.

आज गोकुळात रंग खेळतो हरी...
SHARES

सिनेरसिकांप्रमाणं रुपेरी पडद्यानंही कायम सणांचा आनंद लुटला आहे. त्यातल्या त्यात मराठी सिनेमानं नेहमी मराठमोळे सण साजरे करत त्यातील गीत-संगीतानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. गोकुळाष्टमीचा सणही मराठी सिनेमांनी मोठ्या भक्ती भावानं साजरा केला आहे.

भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच गोकुळाष्टमी... या सणाचं औचित्य साधत काही मराठी सिनेमांनी रसिकांना अजरामर गीतांची भेट दिली आहे. अगदी कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट काळातील दिग्दर्शकांपासून रंगीत सिनेमांच्या युगातील फिल्ममेकर्सनाही या सणानं मोहिनी घातली आहे. त्यामुळंच मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या या सणाचं प्रतिबिंब कायम मराठी चित्रपटांमध्ये उमटल्याचं पहायला मिळालं आहे. श्रीकृष्णाष्टमीचा उपवास आणि पहाटेपासून सर्वत्र वाजणारी काही चित्रपट गीतं या सणाचा आनंद द्विगुणीत करतात.

कृष्णधवल युगातील गाण्यांचा बाज काही वेगळाच होता. त्या काळातील संगीताची लय आणि धुनही नंतरच्या काळातील संगीतापेक्षा फार वेगळी होती. १९५१ मधील 'अमर भूपाळी' या चित्रपटातील शाहीर होनाजी बाळा लिखित 'सांगा मुकूंद कुणी हा पाहिला...' हे गीत ऐकल्यावर त्याची प्रचिती येते. आशा भोसले आणि पंडीतराव नगरकर यांनी गायलेलं हे गीत वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं आहे. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात पंडीतरावांनी शाहीर होनाजी बाळांची व्यक्तिरेखा साकारली आहे, तर संध्या यांनी गुणवंती बनून त्यांना साथ दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=l16JVtJ5mX0

१९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या 'उमज पडेल तर' या सामाजिक चित्रपटातील 'घननीळा, लडीवाळा झुलवू नको हिंदोळा...' हे ग. दि. माडगूळकर लिखीत आणि बाबूजी म्हणजेच सुधीर फडके संगीत दिग्दर्शित पहाडी रागातील गीत एका वेगळ्याच विश्वात नेणारं आहे. बाबूजी यांनी माणिक वर्मांसोबत हे गीत गायलंही आहे. चित्रा, रमेश देव, दादा साळवी, शांता जोग, जीवनकला, आत्माराम भेंडे, शरद तळवळकर, दत्तोपंत आंग्रे, शोभा खोटे आदी कलाकारांच्या अदाकारीनं हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचं काम केलं.

https://www.youtube.com/watch?v=LL1bZn7YOcw

१९६८ मध्ये मराठी रसिकांच्या भेटीला आलेल्या 'एक गाव बारा भानगडी' या तमाशापटातील 'कशी गवळण राधा बावरली...' या राधा-कृष्णावर आधारित गीतानं सर्वांनाच मोहिनी घातली. जयश्री गडकर, अरुण सरनाईक आणि गणपत पाटील यांच्यावर चित्रीत झालेलं हे गीत कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलं आहे. राम कदम यांनी भैरवी रागात याची चाल बांधली आहे. सुमन कल्याणपूर यांच्या सुमधूर आवाजानं हे गीत अधिक श्रवणीय करण्याचं काम केलं. मराठी चित्रपटातील ब्लॅाकबस्टर ठरलेल्या  या चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत माने यांनी केलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=_MhTSE3or6w

'सतीचं वाण' या १९६९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दत्ता धर्माधिकारी यांच्या चित्रपटातील 'किती सांगू की सांगू कुणाला...' हे गाणं आजही रसिकांना ताल धरायला लावतं. या चित्रपटातील कृष्णजन्माष्टमीचं हे गीत जगदीश खेबूडकरांनी लिहिलं असून, प्रभाकर जोग यांनी आशा भोसलेंच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. गोकुळाष्टमीचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या या गीतात अभिनेते धुमाळ कृष्ण बनल्याचं पहायला मिळतं. यात त्यांच्या जोडीला आशा काळे, कृष्णकांत दळवी, गजगेश्वर, तारा किणीकर, पुष्पा जोशी, बी. माजनाळकर, मधू आपटे, लता कर्नाटकी, ललिता पवार, वसंत शिंदे, शांता तांबे आदी कलाकार आहेत.

https://www.youtube.com/watch?v=9eC55l4cXcs

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'आज गोकुळात रंग खेळतो हरी...' हे गीत भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं दर्शन घडवतं. सुरेश भटांनी लिहिलेल्या या गीताला पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी अत्यंत सुरेल संगीताची किनार जोडली आहे. आजही हे गाणं वाजू लागलं की रसिक तल्लीन होतात. सुरेश भटांच्या अर्थपूर्ण शब्दांना लतादीदींच्या आवाजाची मोहिनी लाभली आणि हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सर्वांच्याच हृदयावर कोरलं गेलं. आजही लतादीदी जेव्हा या गाण्याविषयीची आठवण सांगतात, तेव्हा मराठी सिनेमांच्या सुवर्णयुगाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

१९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या कमलाकर तोरणे दिग्दर्शित 'बाळा गाऊ कशी अंगाई' या चित्रपटातील आशा काळे यांच्यावर चित्रीत झालेलं 'अरे मनमोहना कळली नाही तुला राधिका...' हे एव्हरग्रीन गाणं आजही खूप पॅाप्युलर आहे. विक्रम गोखले, पु. ल. देशपांडे, मधुकर तोरडमल यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय आहेत, पण आशा भोसले यांच्या आवाजातील एन. दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गोकुळाष्टमी स्पेशल आहे. हे गाणंही जगदीश खेबूडकरांनी लिहिलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=0pABNu9_15U

'जानकी' या १९७९ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात पुन्हा लतादीदींच्याच आवाजाची जादू अनुभवायला मिळाली. यातील 'झुलतो बाई रास झुला...' हे गीत अजरामर झालं आहे. गीतकार श्रीधर मोघे यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतालाही हृदयनाथ यांनीच संगीत दिलं आहे. डॅा. श्रीराम लागू, सीमा देव, अशोक सराफ, उषा नाईक, राज गोस्वामी, धुमाळ आदी त्या काळातील दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. मराठी चित्रपटातील हा गरबा रास प्रेक्षकांना चांगलाच भावला आणि हा चित्रपट हिट झाला.

https://www.youtube.com/watch?v=6Itg2um3VDs

१९८१ मध्ये आलेल्या दिग्दर्शक व्ही. के. नाईक यांच्या 'गोधळात गोंधळ' या चित्रपटातील 'अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग...' या गाण्यात अशोक सराफ आणि रंजना या त्या काळातील लोकप्रिय जोडीचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळतो. अशोक सराफ कृष्णाच्या, तर रंजना राधेच्या रूपात दिसते. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या सुमधुर आवाजानं सजलेलं हे सदाबहार गीत कानी पडताच या गीताच्या तालावर नृत्य करणारी अशोक-रंजनाही ही जोडी अनाहुतपणं डोळ्यांसमोर येते. जगदीश खेबूडकर लिखीत हे गीत संगीतकार विश्वानाथ मोरे यांनी शंकरा या रागात बांधलं आहे.

https://www.facebook.com/watch/?v=199808440187020

संजय रावल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वजीर' या चित्रपटातील 'सांज ये गोकुळी...' हे आशा भोसले यांच्या आवाजतील गाणंही खूप गाजलं आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गीतांना सुधीर फडके यांनी स्वरसाज चढवला आहे. अशोक सराफ, विक्रम गोखले, अश्विनी भावे, उज्वल ठेंगडी, इला भाटे, आशुतोष गोवरीकर, कुलदीप पवार, चंद्रकांत गोखले, कुसुम देशपांडे, फैयाज, प्रतिभा अमृते, सयाजी शिंदे, सुधीर जोशी, प्रदीप वेलणकर, सुनिल शेंडे, अर्जुन ठेंगडी, इर्शाद हाश्मी, वरदा बाळ, ऐश्वर्या सबनीस, आदित्य राव ही दमदार स्टारकास्ट ही या चित्रपटाची खासियत ठरली. गोकुळाष्टमीच्या सणाचं औचित्य साधत चित्रपटांमध्ये आलेली राधा-कृणाची महती वर्णनारी ही गीतं मराठी रसिकांना आजही ताल धरायला लावतात यातच यांचं यश दडलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=Gzt4c8lZj0E



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा