आता मराठीत अनुभवा फॅमिली ड्रामा


SHARE

कौटुंबिक, नातेसंबंध आणि लग्न सोहळ्याची धमाल असणारे सिनेमा रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरले. रसिकांना या सिनेमांमधील फॅमिली ड्रामा चांगलाच भावला. त्यामुळेच राजश्री प्रोडक्शन्सच्या 'हम आपके है कौन' आणि 'हम साथ साथ है', 'विवाह' अशा सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतले. असे चित्रपट हिंदीत तुफान हिट ठरले असले तरी मराठीत असा प्रयोग झालेला नाही. लग्नातील धमाल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत मराठी सिनेमात रसिकांनी अनुभवली नव्हती. मात्र आता लवकरच मराठी सिनेमात रसिकांना 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसारखी कथा पाहायला मिळणार आहे.


ही जोडी पुन्हा एकत्र

दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सिनेमाचं नाव अद्याप ठरलं नसलं तरी यांत लग्नाची धमाल आणि नात्यांची गुंतागुंत अनुभवता येणार आहे. 'बंध नायलॉन'चे या मराठी सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठे या सिनेमात एकत्र दिसतील. तब्बल दोन वर्षांनी ही जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे.

सुबोध आणि श्रुती यांच्यासह डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, किशोरी अंबिये, आनंद इंगळे अशी दमदार कलाकारांची तगडी फौज असणार आहे. या सिनेमाचं शूटिंग दुबई आणि इगतपुरीमध्ये झालं आहे.


सिनेमाची कथा

लग्नाच्या निमित्ताने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येतात. त्यानंतर कशी धमाल, मजामस्ती होते, नात्यांचे बंध कसे उलगडतात हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. डेस्टिनेशन वेडिंग, लग्न सोहळ्यातील परंपरा आणि लग्नसंस्था हे रसिकांना अनुभवता येणार आहे.

सध्या लोकांचा लग्नसंस्था, यातील परंपरा यावरील विश्वास उडत चालला आहे. या गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होऊ नये यासाठी सिनेमातून प्रयत्न केल्याचे समीर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. जून २०१८मध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या