Advertisement

ज्येष्ठ संतूरवादक उल्हास बापट यांचं निधन


ज्येष्ठ संतूरवादक उल्हास बापट यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट (६७) यांचं गुरूवार ४ जानेवारीला अल्पशा आजाराने निधन झालं. बापट यांनी हिंदूजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा यांच्या गाण्यांना संतूरसाज चढविणारे कलाकार अशी त्यांची ओळख होती. पंचमदा यांच्या पुण्यतिथीलाच बापट यांनी जगाचा निरोप घेतला, हा योगायोगच म्हणावा लागेल.


'फिक्स्ड ट्यूनिंग' वापरणारे एकमेव

जगातील उत्कृष्ट संतूर वादकांपैकी एक अशी पं. बापट यांची ओळख आहे. संतूरच्या तारा जुळविण्यासाठी ’क्रोमॅटिक सिस्टिम’(फिक्स्ड ट्यूनिंग) अचल थाट पद्धती वापरणारे ते एकमेव वादक होते. बापट यांनी १९८८ पासून कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंडचे दौरे करत भारताबाहेरही प्रसिद्धी मिळवली.



गाजलेल्या गाण्यांसाठी संतूर वादन

मराठी, हिंदी चित्रपटांतील अनेक गीतांसाठी उल्हास बापट यांनी संतूरवादन केलं. संगीत दिग्दर्शक शारदापासून आत्तापर्यंतच्या बहुतेक संगीत दिग्दर्शकांनी बापटांच्या संतूरवादनाचा उपयोग करून घेतला. ’घर’पासून ते ’१९४२ ए लव्ह स्टोरी’ आणि ’जैत रे जैत’, या हिट चित्रपटांत आणि आशा भोसले यांच्या ’ऋतू हिरवा’ या अल्बममध्येदेखील पं. बापट यांच्या संतूरवादनाची झलक ऐकायला मिळते.


अल्प परिचय

३१ ऑगस्ट १९५० रोजी उल्हास बापट यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. उल्हास बापट यांनी पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याचं शिक्षण घेतलं. पुरसं तबलाशिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू मानलं.

दोन घराण्यांच्या गायकीच्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. इतक्या विविध अनुभवांनंतर उल्हास बापट यांना, आपल्याला संतूर या वाद्यात रस असल्याचा शोध लागला, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. १९७५ मध्ये पंडित रवीशंकर यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ’संचरिणी’तील खासगी बैठकीत उल्हास बापट यांनी आपले वादन श्रोत्यांपुढे पहिल्यांदा सादर केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा