राष्ट्रवादीचे 'लोंढे' काँग्रेसमध्ये

 Pali Hill
राष्ट्रवादीचे 'लोंढे' काँग्रेसमध्ये

मुंबई - राजकारणातल्या 'घड्याळा'ची टिकटिक मंदावतेय, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काँग्रेसच्या 'हाता' ला साथ द्यायचा निर्णय अंमलात आणलाय. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत लोंढे यांनी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. "कुठलंही पद किंंवा मतभेदामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली नाही. संघ विचारधारेशी सुरू असलेल्या लढाईत झोकून देणं माझं कर्तव्य आहे. देशात अनागोंदी माजतेय, असहिष्णुता वाढतेय, आणीबाणी लादली जातेय की काय? असं वाटण्याजोगी परिस्थिती अाहे. अशा प्रसंगी इतर कुणाचं 'बोट' धरण्यापेक्षा काँग्रेसचे हात बळकट करणं योग्य वाटल्यामुळे मी हा निर्णय घेतला." अशी टिपीकल वैदर्भिय ठसक्याची प्रतिक्रिया अतुल लोंढे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयाची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यापैकी कुणालाही न दिल्याची पुस्तीही लोंढे यांनी जोडली.

दरम्यान, भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी मंगळवारी मुंबईत दाखल झालेल्या राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे राज्यातले दिग्गज नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या 'भाऊ'गर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसमधले 'भाऊ' अतुल लोंढे यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. विचारधारेशी प्रामाणिक राहून व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याचं समाधान बोलून दाखवणाऱ्या लोंढे यांनी काँग्रेसमध्ये कुठलं पद भूषवण्याची संधी मिळणार या प्रश्नावर मात्र सूचक मौन बाळगलं.

Loading Comments