मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती होणार की नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पण, भाजपा मात्र स्वबळाची जोरदार तयारी करताना दिसत आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपाने मंगळवारी मेळावा घेतला. तर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी याच मतदारसंघात पाच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालयाचं उद् घाटन केलं. आम्ही आमची तयारी करत असल्याचं या वेळी भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे एकीकडे युतीचं गुऱ्हाळ सुरु ठेवायचं आणि दुसरीकडे स्वबळाची तयारी करायची अशा प्रकारचं चित्र सध्या मुंबईत पहायला मिळत आहे.