Advertisement

'ये दिवार टूटती क्यूॅ नही', असे म्हणण्याची वेळ विरोधकांवर येईल

राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार फटकेबाजी करताना भाजपवर तुफान हल्ला चढवला

'ये दिवार टूटती क्यूॅ नही', असे म्हणण्याची वेळ विरोधकांवर येईल
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार फटकेबाजी करताना भाजपवर तुफान हल्ला चढवला. ये दिवार टूटती क्यू नही.. ये महाविकास आघाडी की दिवार टूटेगी कैसे? अंबुजा.. एसीसी.. बिर्ला सिंमेटसे जो बनी है, असे म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे, असा टोला अजित पवार यांनी भाजपला लगावला.

मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिवसीय कार्यकर्ता शिबीराचे आयोजन केले आहे. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरू केली आहे, असे सांगतानाच या सरकारने सत्तेवर येताच मागच्या सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय बदलले आहेत. कदाचित भाजपला हे निर्णय योग्यही वाटत असतील. पण ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत. आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत. ज्या कामांच्या बाबतीत शंका येते. जी कामे जनतेच्या भल्याची नाहीत, ती कामे आम्ही थांबवली आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अभेद्य आहे.

हे सरकार पाच वर्षे चालेल. सरकारला काहीही धोका नाही. विरोधकांनी कितीही वावड्या उठवल्या तरी त्याने काहीच फरक पडणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. समाजाचे भले करण्यासाठी पदाचा उपयोग करा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना व मला मान खाली घालावी लागेल असे वागू नका, असे सांगतानाच आता हौसे नवशे गवशे येतील मात्र त्यांना पदांपासून दूर ठेवा. दोन वर्ष त्यांना काम करू द्या, मगच त्यांचा विचार करू, असा आदेश अजित पवार यांनी दिला. पदे मिळाली ते पक्ष सोडून गेले त्यामध्ये सचिन अहिर, संजय पाटील, चित्रा वाघ, प्रसाद लाड असे सगळे निघून गेले आहेत. मात्र असे कार्यकर्ते शोधा जे सत्ता नसताना आपल्याकडे राहतील. जे कोण चिकटायला आले आहेत. त्यांना दोन वर्ष काही देवू नका. त्याला काम करू द्या, असे ते म्हणाले.

गिरणी कामगारांसाठी घरांची सोडत निघत आहे. पोलिसांना चांगली घरे कशी देता येईल याचा प्रयत्न केला जात आहे. डबेवाल्यांनाही विश्‍वास देण्याचा माझ्या सहकार्यांचा प्रयत्न आहे. मुंबापुरी सर्वांची आहे, त्यांना ती आपली वाटली पाहिजे असे काम आपल्याला करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा