Advertisement

मोदी जिंकले, पण राहुल गांधीच 'बाजीगर'!

मोदींच्या भाजपाच विजय होऊनही पीछेहाट आणि राहुल गांधींच्या काँग्रेसचा पराभव होऊनही आगेकूच...हा गुजरात निकालांचा सर्वात मोठा सार दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. खास करून पराभवाच्या नामुष्कीने पछाडलेल्या काँग्रेससाठी राहुल गांधींची ही बाजी यशस्वी ठरल्याचं चित्र आहे. त्यामुळे 'मोदी जरी जिंकले, तरी राहुल गांधी 'बाजीगर' ठरले' असंच म्हणावं लागेल.

मोदी जिंकले, पण राहुल गांधीच 'बाजीगर'!
SHARES

'जो हारकर भी जितता है, उसे बाजीगर केहेते हैं'...'बाजीगर' चित्रपटातला हा डॉयलॉग गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरा ठरला. कारण या निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्या देशभरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी निकाल पाहून एकच वाक्य होतं. 'मोदीजी जिंकले, पण राहुल गांधी बाजीगर ठरले!' त्यामुळे पराभव जरी झाला असला, तरी काँग्रेससाठी मात्र ही निवडणूक फायद्याचीच ठरली आहे. विशेषत: नुकतेच राहुल गांधी अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर तर पक्षासाठी आणि स्वत: राहुल गांधींसाठीही ही संजीवनी ठरावी. अर्थात, विजय मिळाला असता, तर राहुल गांधींचा आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास दामदुपटीने वाढला असता.

मुळात विकासाच्या मुद्द्यावर लढवण्यात आलेली ही निवडणूक सुरुवातीपासूनच गुजरातमधल्या मूलभूत विकासकामांपेक्षाही देशभरातल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लढली गेली. यामध्ये जसे जीएसटी, नोटबंदीसारखे मुद्दे होते, तसेच ते हिंदू मुस्लिम संबंधांचेही होते. त्यामुळे सर्वात आधी ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की गुजरातच्या जनतेने गुजरातमधल्या मुद्द्यांपेक्षाही राष्ट्रीय मुद्द्यांवर अधिक मतदान केलं आहे.

भाजपाच्या विजयाचं गुजरातच्या अहमदाबादपासून थेट मुंबईच्या गल्लीबोळापर्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईत तर काही ठिकाणी निकाल येण्याआधीच भाजपच्या विजयाचे बॅनर झळकले होते! (इतका विश्वास खात्रीशीर माहिती असल्याशिवाय असणं तसं कठिणच वाटतं!) भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यासोबत जल्लोष केला. मात्र, त्यांच्या मागे 'सामना' नावाच्या बॅन्जोचा बोर्ड आणि हातात त्याच 'सामना'चा ढोल हे योगायोगाने जुळून आलेलं चित्र खूप काही सांगून जात होतं. येणाऱ्या काळात शिवसेना आणि भाजपमधले संबंध कोणत्या दिशेला जाऊ शकतात, हे यातून सहज प्रतीत व्हावं.



२०१९मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र त्याआधीच शिवसेनेच्या युवराजांनी अर्थात आदित्य ठाकरेंनी वर्षभरात भाजपपासून वेगळे होण्याचे संकेत दिले. मात्र, गुजरात निकालांनंतर शिवसेनेला त्यांच्या या विचाराला मुरड घालावी लागणार आहे. कारण, एक तर व्होटबँक आणि मतदारवर्गाचा पाठिंबा या गोष्टी भाजपच्या बाजूला झुकलेल्या असतील. आणि दुसरं म्हणजे या विजयानंतर भाजप अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१९मध्ये शिवसेनेला जागांच्या तडजोडीमध्ये अधिकच पडती बाजू घ्यावी लागू शकते. विजयानंतर 'कलानगरवाल्यांचं डिपॉझिटही जप्त होईल' ही आशिष शेलार यांची प्रतिक्रिया शिवसेनेसाठी पुढे काय वाढून ठेवलं आहे, हे सांगण्यासाठी पुरेशी बोलकी ठरावी!

शिवसेनेनेही यंदा भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच गुजरातमध्ये काँग्रेसप्रमाणेच मोदींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला पक्षाला खातं उघडून देता आलं नाही. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराची मतांची आकडेवारी तिनअंकीच्या पुढे जाऊ शकली नाही!

मात्र दुसरीकडे गुजरातमध्ये काठावर मिळालेल्या विजयावर भाजपनं नक्कीच गांभीर्यानं विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. मोदी लाटेवर स्वार होऊन गुजरातमध्ये मोदींच्या झालेल्या ३४ सभांपैकी १४ ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा त्यांच्याच गृहराज्यात कमी होत असल्याचं हे प्रतीक आहे. शिवाय, गेल्या २३ वर्षांपासून सलग सत्तेत असलेल्या भाजपला सत्तेच्या बाबतीत प्रचंड पिछाडीवर असलेल्या काँग्रेसने दिलेली टक्कर नक्कीच भाजपसाठी काळजीचा विषय आहे. १५० जागा हमखास मिळवू अशी फुशारकी मारणाऱ्या भाजपला दोन अंकी आकड्यावरच समाधान मानावं लागणं हे 'मोदी' नावावरचं मोठं प्रश्नचिन्ह आहे! आगामी दोन वर्षांमध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपसाठी हा इशाराच आहे. अर्थात, तो समजून घेण्याइतके भाजप आणि त्या पक्षातील नेतेमंडळी सुजाण नक्कीच आहेत.

भाजप जरी त्यांच्या पद्धतीने या निकालांचा अर्थ लावणार असला, तरी काँग्रेस मात्र २०१४पासून झालेल्या निवडणुकांमधून कोणताही बोध घ्यायला तयार नाही. वास्तविक पाहाता राहुल गांधींना अध्यक्षपदी 'बसवल्या'नंतर गुजरातच्या निवडणुका या एकाच वेळी राहुल गांधींच्या नेतृत्वाची कसोटी आणि महत्त्वाचं आव्हान होतं. राहुल गांधींनाही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. मात्र, या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही.

वरवरच्या सभा आणि वरवरचे दावे सोडता निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून 'कन्स्ट्रक्टिव्ह' काम दिसलं नसल्याचा अनुभव गुजरात निवडणुकांचा जवळून अभ्यास करणारी मंडळी करतात. शिवाय, जीएसटी, नोटबंदी यामुळे गुजरातमधला नरेंद्र मोदी+भाजपचा सर्वात मोठा पाठिराखा असणारा व्यापारी वर्ग यंदा विरोधात होता. मात्र, काँग्रेसला त्याचा फायदा उठवता आला नाही.

२००१ ते २०१३ या मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या १३ वर्षांच्या काळात झालेल्या कोणत्याही निवडणुकीत न दिसलेली अॅण्टि इन्कम्बन्सी यंदा गुजरातमध्ये दिसत होती. मात्र, त्या जोरावर काँग्रेसला चांगली टक्कर देता आली असली, तरी 'बुल्स आय हिट' करता आलेला नाही, हे वास्तव आहे! गेल्या गुजरात निवडणुकांपेक्षा या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये नक्कीच वाढ झाली असली, तरी ती का झाली आहे? पक्षाच्या कामामुळे झाली आहे की गुजरात सरकारच्या विरोधामुळे? जीएसटी, नोटबंदीमुळे की काँग्रेसच्या न दिसलेल्या 'ग्राऊंडवर्क'मुळे? या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसच्या थिंक टँकला शोधावी लागणार आहेत.

मोदींच्या भाजपाच विजय होऊनही पीछेहाट आणि राहुल गांधींच्या काँग्रेसचा पराभव होऊनही आगेकूच...हा गुजरात निकालांचा सर्वात मोठा सार दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. खास करून पराभवाच्या नामुष्कीने पछाडलेल्या काँग्रेससाठी राहुल गांधींची ही बाजी यशस्वी ठरल्याचं चित्र आहे. त्यामुळे 'मोदी जरी जिंकले, तरी राहुल गांधी 'बाजीगर' ठरले' असंच म्हणावं लागेल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा