"...तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा"

  Pali Hill
  "...तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा"
  मुंबई  -  

  मुंबई - "मराठा मोर्चांबाबत सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्राबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माफी मागितली नसती तर त्यांना दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात घ्यावा लागला असता', असा टोला स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष, आमदार नितेश राणे यांनी शनिवारी लगावला.

  मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी शिनसेनेवर चौफेर हल्ला केला. राणे म्हणाले, "सामनातील 'त्या' व्यंगचित्राबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. सामनाच्या 'त्या' व्यंगचित्राबद्दल मराठा समाज सेनेला बॅलेटमधून उत्तर देईल. सामना आधीपासूनच मराठ्यांच्या विरोधात आहे. जेम्स लेन प्रकरण, दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढल्यानंतर शिवसेनेने केलेला विरोध सर्वांनीच पाहिला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यालाही मराठा मोर्चामधून विरोध होत आहे. दोन शिवजयंतींचा घोळ कुणी घातला हेही राज्याला माहीत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माफी मागितली नसती तर दसरा मेळावा त्यांना मातोश्रीच्या अंगणात घ्यावा लागला असता".
  यावेळी राज्यात मोठ्या संख्येने निघत असलेल्या मराठा मोर्चांचेही राणे यांनी अभिनंदन केले. मराठा समाजाने आतापर्यंत अतिशय शांत आणि शिस्तबद्ध असे २४ मोर्चे काढले आहेत. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकाबद्दलची खरी माहिती जनतेला कळणे, अशा प्रमुख मागण्या या मोर्चातून मांडण्यात आल्या आहेत. तरीही सरकार यापुढे चर्चा करू, असे म्हणून समाजाची फसवणूक करत आहे", असा आरोप राणेंनी केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.