SHARE

महाराष्ट्र हॉकी असोसिएशन लीगमधील सुपर डिव्हिजनच्या अंतिम फेरीत सेंट्रल रेल्वेने जेतेपदावर गवासणी घालत ६-३ अशा फरकाने मुंबई कस्टम संघाचा पराभव केला. ही स्पर्धा चर्चगेट येथील महिंद्रा स्टेडियमवर खेळवण्यात आली. सेंट्रल रेल्वेच्या खेळाडूंनी दुसऱ्या सत्रात हॅट्ट्रिक करत सामन्यावर आपले वर्चस्व राखले.


सेंट्रल रेल्वेचे खेळाडू चमकले

सुरुवातीला सेंट्रल रेल्वेच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत २-१ ने आघाडी मिळवत मुंबई कस्टमला दबावाखाली आणले. ही आघाडी मोडीत काढण्यासाठी कस्टम संघाने पूर्णपणे प्रयत्न केला. पण सेंट्रल रेल्वेच्या गोलकीपरने एकही गोल होऊ न दिल्यामुळे कस्टमला या सामन्यात मोठ्या फरकाने परभवाचा सामना करावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला सेंट्रल रेल्वेच्या राजेंद्र पवार याने चौथ्या मिनिटाला गोल केला.


म्हणून कस्टम संघ पराभूत

कस्टमच्या जयेश जाधव याने १९व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. नंतर ३२ व्या मिनिटाला सेंट्रलच्या रेउबेन केदारी याने गोल करत पहिल्या सत्रात आघाडी मिळवली. पण काही वेळाने दुसऱ्या सत्रात सेंट्रलच्या निझामुद्दीन याने हॅट्रिक करत आपल्या संघाचा पाया विजयासाठी मजबूत केला. त्याने सलग ४०, ४४ आणि ४८ व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक केली. त्याच्या या शानदार खेळीचा संघाला मोठा फायदा झाला. या आघाडीमुळे मुंबई कस्टम संघ मानसिक दबावाखाली आला.


उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार

कस्टमच्या अभिषेक सिंहने आक्रमक खेळीच्या जोरावर दोन गोल केले. पण आघाडी काही मोडता आली नाही. तर सेंट्रलच्या बीजेंद्र सिंह याने ६९ व्या मिनिटाला गोल करत ६-३ अशी मोठी आघाडी घेत विजय साकारला. या स्पर्धेत विजेत्या सेंट्रल रेल्वे संघाला १ लाख १० हजाराचा धनादेश आणि सुपर लीग चषक तर उपविजेत्या संघाला ७० हजार रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला ३ हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला.


संबंधित विषय
ताज्या बातम्या