SHARE

वाईल्ड कार्डने प्रवेश मिळवलेल्या अंकीता रैनाने पहिल्या फेरीत रशियाच्या वेरॉनिका कुद्रेमेतोवा हीला नमवले. त्यानंतर जागतिक क्रमवारीत २९३व्या स्थानी असलेल्या २४ वर्षीय अंकीताने थायलंडच्या बिनमानांकित पिआंगटार्न प्लिपुएच हीचा सरळ सेटमध्ये पराभव करत एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५ के सिरीज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अंकीताच्या या खेळासमोर थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला जास्त काळ टिकता आले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये तीन ब्रेकसह अंकीताने २५ वर्षीय प्रतिस्पर्धी खेळाडूला गुरुवारी सीसीआय सेंटर कोर्टवर झालेल्या दुसऱ्या फेरीत ६-२, ६-२ असे पराभूत केले.


६-२ ने सामना जिंकला 

प्लिपुएचने ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकित लिझेट काबरेराला नमवत आश्‍चर्यकारक निकालाची नोंद केली होती. यावेळी अंकीता विरुद्ध झालेल्या दोन सेटमध्ये प्लिपुएचने एकादाच सर्व्हिस ब्रेक करण्यात यश मिळाले. पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करत तसेच, दोन चुकांमुळे थाई खेळाडूला १५-४० अशी आघाडी घेता आली. यानंतर अंकीताने पुनरागमन करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. अहमदाबादला जन्मलेल्या आणि पुण्यामध्ये स्थायिक असलेल्या अंकीताने सहाव्या आणि आठव्या गेममध्ये देखील चमक दाखवत सेट ६-२ असा आपल्या नावे केला.


उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली भारतीय

यानंतर अंकिताने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमधील दुसऱ्या, सहाव्या आणि आठव्या गेममध्ये चमक दाखवत १ तास ७ मिनिटांत सामना संपवला. अंकीता ही या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली भारतीय ठरली. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून प्रवेश मिळवणाऱ्या करमन कौर थंडी, ऋतुजा भोसले आणि झील देसाई यांना पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले.

मी तिच्याविरुद्ध यापूर्वीही खेळले. त्यामुळे मला तिच्या खेळाबद्दल माहीत होते. मी नेहमी आक्रमक फटके मारते. पण, यावेळी मी तसे केले नाही. मी ड्रॉप शॉट खेळत तिची लय बिघडवण्याचा प्रयत्न केला. असे अंकीता सामना संपल्यानंतर म्हणाली. मी सकाळी माझे प्रशिक्षक हेमंत बेंद्रेंसोबत सराव केला. यापूर्वीच्या सामन्यापेक्षा यंदा मी चांगली खेळले, असे ती पुढे म्हणाली. पुढच्या फेरीत तिचा सामना फ्रांसच्या अमानदीन हेसेशी होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या