Advertisement

मुंबई महापौर चषक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राचा बोलबाला


मुंबई महापौर चषक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राचा बोलबाला
SHARES

मुंबई महापौर चषक तिरंदाजीच्या अखिल भारतीय स्पर्धेत महाराष्ट्राने धम्माल उडवली. तब्बल 200 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी 122 पदकांवर निशाणा साधला तर जिल्हास्तरीय स्पर्धेत गोरेगावच्या प्रबोधन तिरंदाजी केंद्राने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी 15 सुवर्णांसह 31पदकांचा वेध घेतला तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या पोयसर जिमखान्याने 11 सुवर्णांसह 21 पदके जिंकली.

अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापौर तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राचाच बोलबाला दिसला. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई तिरंदाजी संघटनेच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेत 10, 14, 17 आणि 19 वर्षांखालील, तसेच वरिष्ठ आणि वयस्कर अशा एकंदर सहा गटांसाठी खेळाडूंमध्ये लढती झाल्या. स्पर्धेत महाराष्ट्रासह हरयाणा, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीर या राज्यातील खेळाडूंचा मोठ्या संख्येने सहभाग होता. स्पर्धेत सहा गट होते. प्रत्येक गटात महाराष्ट्राचेच वर्चस्व दिसत होते. अनेक गट असे होते की, ज्यात फक्त महाराष्ट्राचेच खेळाडू पदक विजेते ठरले. महाराष्ट्राच्या खालोखाल हरयाणा आणि तामिळनाडूच्या खेळाडूंनी बाजी मारली.

स्पर्धेवर महाराष्ट्राचे वर्चस्व असले तरी 19 वर्षांखालील मुलांच्या गटात बांबू वुडन प्रकारात तिन्ही पदके हरयाणाने जिंकली. दोन गटात आंध्र प्रदेशनेही सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक अर्धशतकी मजल मारली. सुवर्णपदकांचे सुवर्ण महोत्सव साजरे करणाऱ्या महाराष्ट्राने 35 रौप्य आणि 37 कांस्य पदकेही जिंकली. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार आणि मंत्री सुभाष देसाई आणि मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत पार पडला.

तिरंदाजी स्पर्धेत उपनगरातील संघांचा दबदबा दिसून आला. स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू प्रबोधन,पोयसर जिमखाना, अस्मिता तिरंदाजी केंद्र या संघांचेच खेळले. प्रबोधनच्या मुलांनी 9 सुवर्ण, 7 कांस्य जिकंले त्यांनी 36 पैकी 15 सुवर्णांवर आपले नाव कोरले. तसेच पोयसरच्या धृव देसाईने 4 सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्यासारखी कामगिरी याघवी सत्याने केला आणि 4 सुवर्ण जिंकले. शौर्य जोशीने 4 रौप्य पदकांची कमाई केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा