Advertisement

महाराष्ट्र पोलीस, आयकर-पुणे, मध्य रेल्वेची आगेकूच


महाराष्ट्र पोलीस, आयकर-पुणे, मध्य रेल्वेची आगेकूच
SHARES

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. आणि मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या महिलांच्या 'क' गटात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने मध्य रेल्वे विभागाला 32-12 ने नमवित अग्रस्थान मिळविले. विश्रांतीला 15-06 अशी आघाडी घेणाऱ्या विद्युत वितरणने त्यांना नंतर डोकं वर काढू दिले नाही. कोमल देवकर, तेजश्री सारंग यांच्या झंझावाती खेळापुढे रेल्वेच्या लता भगत, लता बोटे यांची डाळ शिजली नाही. 

दुसऱ्या सामन्यात रेल्वेला एम्राल्ड इन्फ्राट्रक्चरकडून 28-30 असा दोन गुणांनी निसटता पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांच्यावर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. अनुभवी सुमती सुवर्णा (पुजारी), लता बोटे यांच्या उत्कृष्ट खेळामुळे रेल्वेने विश्रांतीला 15-14 अशी नाममात्र आघाडी घेतली होती. पण ती त्यांना राखता आली नाही. एम्राल्डच्या सायली फाटक, सानिका जोशी यांनी उत्तरार्धात आपला खेळ उंचावत संघाला बाद फेरी गाठून दिली.

व्यावसायिक पुरुषांच्या 'अ' गटात महाराष्ट्र पोलीस-युनियन बँक हा सामना 20-20 असा बरोबरीत सुटला. अजिंक्य कापरे, विजय दिवेकर यांच्या उत्कृष्ट खेळाने बँकेने मध्यांतराला 12-11अशी आघाडी घेतली होती. पण पोलीस संघाच्या रशीद शेख,विवेक भोईर यांनी आपला खेळ उंचावत सामना बरोबरीत सोडविला. 'क' गटात आयकर, पुणे यांनी भारत पेट्रोलियमचा 40-27 असा पराभव केला. पूर्वार्धापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला आयकरकडे 19-17 अशी निसटती आघाडी होती. उत्तरार्धात मात्र तुषार पाटील,मोमीन शेख, सुनील लांडगे यांनी जोरदार आक्रमण व बचाव करीत संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. समीर सावंत, शैलेश सावंत,आकाश सपकाळ यांनी पूर्वार्धापर्यंत कडवी लढत दिली. 

'ड' गटात मध्य रेल्वे डिव्ही.ने पश्चिम रेल्वेला 28-28 असे बरोबरीत रोखले. सुनील जयपाल, रविकुमार यांच्या नेत्रदीपक खेळाने पश्चिम रेल्वेने मध्यांतराला 19-15 अशी आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात मात्र तो जोश त्यांना राखणे जमले नाही. डिव्ही. च्या कमलेश नांदोस्कर, पंकज चव्हाण यांनी आपल्या खेळाची गती वाढवित सामना बरोबरीत सोडविला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा