Advertisement

प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात तारखांचा घोळ, मराठी कलावंत खवळले!


प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात तारखांचा घोळ, मराठी कलावंत खवळले!
SHARES

बोरीवलीतील महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात नाटकांच्या प्रयोगासाठी तारखांचा घोळ घातला जात असल्यानं मराठी कलावंत आणि निर्माचे चांगलेच खवळले. एका विशिष्ट संस्थेला तीन दिवसांच्या सलग ९ प्रयोगांच्या तारखा देण्यात आल्या आहेत. याविरोधात मराठी कलावंतानी थेट महापौरांच्या दरबारीच धाव घेतली आहे.


महापौराच्या मध्यस्थीनंतर...

महापौरांच्या मध्यस्थीनंतर अखेर यातील एक तारीख रद्द करून ती अन्य संस्थेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान अशाप्रकारे नियमबाह्य कारभार चालवणाऱ्या नाटगृहाच्या व्यवस्थापकांची त्वरीत चौकशी करण्याचे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.


गुजराती नाटकांना सलग तारखा

बोरीवलीतील प्रबोधनकार नाट्यगृहातील ११ ते १३ मे २०१८ या कालावधीकरता झी टॉकीजसारख्या एका संस्थेला नाटकांच्या प्रयोगासाठी तारखा देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारचे काही महत्त्वाच्या दिवशी गुजराती नाटकांना सलग तारखा दिल्या जात आहेत.


मग असं का केलं?

महापालिकेच्या नियमानुसार कोणत्याही एका संस्थेला सलग तीन दिवसांच्या तारखा दिल्या जाऊ शकत नाही. तरीही नियम डावलून एका संस्थेला तसेच काही गुजराती नाटकांसाठी अशाप्रकारे सलग तारखा दिल्या आहेत. त्यामुळे मराठी नाटकांचे प्रयोग करता येत नसून याबाबत मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळीसह मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते भरत जाधव, मंगेश कदम, अविनाश नारकर मराठी कलावंत आणि निर्मात्यांनी गुरुवारी थेट महापालिका मुख्यालय गाठलं.

यावेळी त्यांनी उपायुक्त डॉ. किशोर क्षिरसागर यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत ‘त्या’ तारखा त्वरीत रद्द करण्याची मागणी केली. परंतु, उपायुक्तांकडून कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर न मिळाल्याने यासर्वांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. त्यांनी तेथील संबंधित व्यवस्थापकांची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली. त्यानंतर महापौरांनी उपायुक्तांशी चर्चा करून या तीन तारखांपैकी एक तारीख रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 


महापौरांनी दिले चौकशीचे आदेश

नियमबाह्य कारभार करत काही संस्थांना सलग तारखा देणं तसेच मोक्याच्या दिवशी गुजराती नाटकांना तारखा दिल्याच कशा? याबाबत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले. यावेळी झालेल्या बैठकीत सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे आदी उपस्थित होते.


९ प्रयोगांच्या तारखा दिल्या

नियमाप्रमाणे सलग तीन दिवस एकाच संस्थेला नाट्यगृह देता येत नाही. तीन दिवस म्हणजे ९ प्रयोगांच्या तारखा दिल्या होत्या. हे नियमबाह्य असल्यानं उपायुक्तांना पत्र पाठवून यातील एक दिवस कमी करावा आणि तो अन्य संस्थेला दिला जावा, असा सूचना केल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं.

यामध्ये गुजराती नाटकांचा विषय चर्चेत नव्हता. मराठी नाटकांना जास्तीत जास्त  नाट्यगृह उपलब्ध व्हावं ही आमची धारणा असून जर कुठची संस्था तीन-तीन दिवस नाट्यगृह बुक करून ते अडवून ठेवत असेल तर ही बाब योग्य नसून त्यावरच प्रशासनाचं लक्ष वेधून त्यांना याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा