Advertisement

एकदम 'बेस्ट', ही बस केवळ महिलांसाठीच!


SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, रेल्वेप्रमाणं आता बेस्ट प्रशासनही महिलांसाठी 'महिला विशेष बससेवा' सुरू करणार आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासून प्रवाशांची असलेली विशेष बससेवेची प्रतिक्षा संपणार आहे. मुंबईत गर्दीच्या वेळी बसमध्ये चढताना महिलांचा मोठी गैरसोय होते. धक्काबुक्की, अनपेक्षित स्पर्श, आसनावरून होणारे वाद यांसारख्या अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तसंच बस थांब्यावर होणाऱ्या गर्दीमुळं गरोदर महिला प्रवाशांची देखील गैरसोय होते. त्यामुळं गर्दीच्या वेळी फक्त महिला प्रवाशांना बसगाड्या उपलब्ध होण्यासाठी बेस्ट प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं महिला प्रवाशांना आता सुटसुटीत प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.  

बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचीही संख्या लक्षणीय आहे. बसगाड्यांत महिला प्रवाशांसाठी राखीव आसनंही आहेत. मात्र, आसनासाठी या महिला प्रवाशांमध्ये सतत होणारे वाद पाहायला मिळतात. त्यामुळं अनेकदा या महिला स्त्रीयांसाठी राखीव असलेल्या सीटवर न बसता इतर सीटवर बसतात. त्यामुळं पुरूष प्रवासीही वैतागतात. यामुळं महिला प्रवाशांना प्रवास करताना बराच मनस्तापही सहन करावा लागतो. अपुऱ्या बसच्या फेऱ्या आणि वेगाने वाढणारी नागरी लोकसंख्या यामुळे नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. कित्येकदा रांगेत ताटकळत उभं रहावं लागतं. 

महिला प्रवाशांच्या या सर्व समस्या सोडविण्यासाठी बेस्ट प्रशासन राज्य सरकारकडून तेजस्विनी योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या निधीतून महिला विशेष बसची खरेदी करणार आहे. एकूण ३७ नॉन एसी मिडी बस खरेदी करणार आहे. या बससाठी ११ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, एका बसची किंमत २९ लाख ५० हजारांपर्यंत आहे. बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या बस सीएनजीवर धावणाऱ्या आहेत. मात्र, या महिला बस डिझेलवर धावणार आहेत.

महिला विशेष बस खरेदीच्या या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या बैठकीत एकमतानं मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुसार पुढील ४ ते साडेचार महिन्यात या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसमध्ये कॅमेरा, जीपीएस आणि पॅनिक बटण सिस्टिम, दरवाजा बंद करण्याची सिस्टिम, प्रथमोपचार पेटी आणि पॅसेंजर अनाऊन्समेंट सिस्टीम इ. सुविधा असणार आहे.  

मुंबईतील महिला प्रवाशांसाठी सुरू होणाऱ्या या बसबाबत मुंबई लाइव्हनं काही महिला प्रवाशांसोबत बातचीत केली. त्यावेळी त्यांनी खूप आनंद होत असल्याच सांगत बेस्ट प्रशासनाचे आभार मानले. तसंच, 'उशिरा का होईना जाग आली', असं त्यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय इतर प्रवाशांकडून होणाऱ्या त्रासातून सुटका होणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

आसनासाठी होणारे वाद हे महिला विशेष लोकलमध्ये नेहमीच पाहायला मिळतात. हे वाद हाणामारीपर्यंतही जातात. असाच प्रकार महिला विशेष बसमध्ये घडल्यास काय होईल? असा प्रश्न महिला प्रवाशांना विचारला असता त्यांनी, 'महिलांनी प्रवासादरम्यान एकमेकींना समजून घेतलं पाहिजे, ज्या पद्धतीनं सामान्य बसमध्ये प्रवासी गरोदर किंवा ज्येष्ठ महिला प्रवासी असल्यास त्यांना बसण्यासाठी जागा देतात. त्याचप्रमाणं या बसमध्येही द्यावीत. तसंच, समजून घेतलं तर, वाद होणार नाही आणि प्रवासही आनंदाचा होईल', असं मत व्यक्त केलं.



हेही वाचा -

आता NEFT ने २४ तासांत केव्हाही पाठवा पैसे!

बेस्टवरील आर्थिक संकट लवकरच होणार दूर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा