Advertisement

मार्च २०२२ पर्यंत बेस्ट बसचा ताफ्यात होणार वाढ

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मार्च २०२२ पर्यंत बेस्ट बसचा ताफा वाढवण्यात येणार आहे.

मार्च २०२२ पर्यंत बेस्ट बसचा ताफ्यात होणार वाढ
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मार्च २०२२ पर्यंत बेस्ट बसचा ताफा वाढवण्यात येणार आहे. २,५०० पेक्षा अधिक बसगाड्या मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याची माहिती बेस्टच्या अर्थसंकल्पातून देण्यात आली. बेस्टचा २०२१-२०२२चा १ लाख ४४ हजार रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

बेस्टचा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी महापालिकेकडं पाठविण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाचे एकूण उत्पन्न ६८२८.१४ कोटी असून, खर्च ६८२८.१२ कोटी इतका आहे. तर एकूण शिल्लक २ लाख ७ हजार असून, त्यापैकी विद्युतपुरवठा विभागाची शिल्लक ६३ हजार आहे. ही रक्कम विद्युतपुरवठा विभागाच्या भांडवली खर्चाकरिता वापरण्यात येणार आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमाची एकूण शिल्लक १ लाख ४४ हजार एवढी दर्शविण्यात आली आहे.

२०१९-२० या आर्थिक वर्षांमध्ये बसभाड्यातील सवलतीपोटी स्वातंत्र्यसैनिकांकरिता ३ कोटी ३१ लाख, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ३६ कोटी ५३ लाख, ज्येष्ठ नागरिकांकरिता ६४ लाख आणि पत्रकारांकरिता ३१ लाख याप्रमाणं ४० कोटी ७९ लाख एवढा वित्तीय भार सोसावा लागल्याचंही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे.

२०२१-२२ या वर्षांमध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्यांमधून मिळणारं उत्पन्न  २७२ कोटी उत्पन्न आणि ७६२ कोटी रुपये खर्च ४९० कोटी रुपये घट दर्शविण्यात आली आहे. त्यामुळं भाडेतत्त्वावरील बसगाड्या प्रवर्तित करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून उपक्रमाला तोटा सहन करावा लागणार नाही, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी समितीच्या झालेल्या बैठकीत दिले.

बेस्टचा ताफा वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे अर्थसंकल्पातून सांगण्यात आले. सध्याच्या घडीला बेस्टकडे ३,८७५ बसगाड्या असून त्यामध्ये १,०९९ बस भाडेतत्त्वावरील आहेत. याव्यतिरिक्त ३०० विद्युत बसगाड्यांचा खरेदी आदेशही देण्यात आला आहे. तसेच ६०० एकमजली सीएनजी बसगाडय़ांकरिता निविदा प्रक्रिया कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात उपक्रमाचा एकूण बसताफा ३१ मार्च २०२२ पर्यंत ६ हजार ३३७ इतका करण्याचे प्रस्तावित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा