Advertisement

पावसाळा पूर्व तयारीसाठी मध्य रेल्वेवर ड्रोनचा वापर !


पावसाळा पूर्व तयारीसाठी मध्य रेल्वेवर ड्रोनचा वापर !
SHARES

पावसाळा असो किंवा उन्हाळा सतत रखडणारी अशीच काहीशी मध्य रेल्वेची ओळख झाली आहे. पण, आता ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून सुरू आहे. पावसाळ्यात प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करताना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. दरवर्षीप्रमाणे, यंदाही पावसाळ्यापूर्वी रेल्वे ट्रॅक, नालेसफाई आणि कचरा उपसण्याचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलं आहे. ही सर्व कामं योग्य पद्धतीने होत आहेत की नाही? यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्यादांच अशाप्रकारचा प्रयोग मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे.


मुंबई ते पुणे मार्गावर सर्वेक्षण

मुंबई ते पुणे आणि कर्जत ते कसारा भाग डोंगर दऱ्यांचा असून येथे पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. लोकल मार्गावर दरड कोसळू नयेत, यासाठी त्यांचं सर्वेक्षण करून त्या वेळेत हटवण्यासाठी यंदा प्रथमच अत्याधुनिक ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. घाटातील रेल्वेमार्गांवर दरडी, खडी आणि झाडं कोसळण्याचा धोका असतो. या विभागात सर्वाधिक पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसात दरड निसटून खडक तसेच भूस्खलन होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे आता ड्रोनचा वापर केला जाईल असंही मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय कुमर जैन यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.


आयआयटीची मदत

मध्य रेल्वेने यावर्षी नाल्यांच्या खोलीचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीची मदत घेतली आहे. पालिकेच्या हद्दीतील जे नाले रेल्वेच्या हद्दीत येतात त्यांची उंची आणि रेल्वेच्या नाल्यांची उंची समांतर न झाल्याने आयआयटीची मदत घ्यावी लागली आहे. पण, आयआयटीच्या सर्वेचा अहवाल येण्यास उशीर लागणार आहे.

आम्ही दक्षिण-पूर्व म्हणजे कर्जत दिशेकडील दरडी हटवण्याच्या कामाची पूर्व तयारी म्हणून ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं. या भागाचे ९൦ टक्के काम पूर्ण झालं आहे. आता, उत्तर-पूर्व दिशेकडील म्हणजे कसारा दिशेच्या मार्गाचं काम चालू केलं आहे. पावसाळ्यापूर्वी रेल्वेच्या साफसफाईचं काम दोन टप्प्यात होणार असून पालिका आणि रेल्वे संयुक्त तपासणी होईल. कुर्ला आणि शीवमध्ये १० हजार हॉर्स पॉवरचे प्रत्येकी एक इंजिन बसवण्यात येणार आहे.

- एस.के.जैन, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे


भाड्याने घेतले ड्रोन 

धोकादायक खडकाचे स्कॅनिंग करणे आणि तडे शोधून ते सिमेंटने भरण्याचं काम पावसाळ्यापूर्वी केलं जातं. ड्रोनच्या ताफ्यामुळे धोकादायक भागांचे सर्व्हेक्षण करणे सोपे झालं आहे. मध्य रेल्वेने मुंबई पोलिसांकडे ड्रोन वापरण्यासाठी विषेश परवानगी मागितली आहे. मुंबई ते पुणे मार्गावर मान्सून तयारीसाठी ड्रोनने पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति किमी ३ ते ५ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.


सँडहर्स्ट रोडमध्ये गटार ट्रॅकवर सोडले

सँडहर्स्ट रोड स्थानकात रहिवाशांनीच संपूर्ण ड्रेनेज लाईन ट्रॅकवर सोडली आहे. यामुळे लोकल मार्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे. आधीच शहरी कचरा ट्रॅकवरच टाकला जात असताना ड्रोनचं लाईन सोडल्याने यावर तोडगा काढण्याचं आवाहन मध्य रेल्वेने पालिकेला केलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा