Advertisement

सीएनजीच्या दरात वाढ; रिक्षा-टॅक्सीचालकांची भाडे वाढीची मागणी

गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचे भाव हे सतत वाढत असून, त्याचा परिणामी रिक्षा-टॅक्सी चालकांवर होत आहे.

सीएनजीच्या दरात वाढ; रिक्षा-टॅक्सीचालकांची भाडे वाढीची मागणी
SHARES

सध्या प्रत्येक वस्तूंच्या किंमती वाढत जात आहेत. या वाढत्या किंमतींचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अशातच इंधन तेलापासून ते सीएनजी गॅस पर्यंत सर्वांचे भाव वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचे भाव हे सतत वाढत असून, त्याचा परिणामी रिक्षा-टॅक्सी चालकांवर होत आहे. त्यामुळं संतप्त रिक्षा-टॅक्सी चालकांनी आता भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे. ही भाडेवाढ मान्य झाल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

ऑक्टोबरपासून सीएनजी दरामध्ये प्रति किलो १० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या सीएनजीचा दर ६३.५० रुपये प्रति किलो इतका झाल्यानं आता रिक्षा-टॅक्सीचं किमान भाडेदेखील वाढवण्यात यावं, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी चालकांनी केली आहे.

टॅक्सी भाडे दरात ५ रुपये वाढ करत किमान भाडे ३० रुपये करण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. तर, रिक्षाचे किमान भाडे २१वरून २५ रुपये करावे, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे. सातत्याने वाढणाऱ्या सीएनजी दरामुळे टॅक्सीचालकांना आर्थिक फटका बसत आहे. भाडेवाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. 

महानगर गॅसने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपये आणि पीएनजी दरात १.३० रुपये वाढ केली आहे. सध्या १ किलो सीएनजीसाठी टॅक्सी चालकांना ६३ रुपये ५० पैसे मोजावे लागत आहेत.

मुंबई शहरातील साधारणपणे ४० हजार टॅक्सी चालकांना कोरोनाकाळात म्हणजेच मार्च महिन्यात ३ रुपयांची भाडेवाढ देण्यात आली होती. त्यानुसार टॅक्सीचे किमान भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये झाले. आता सीएनजी दर वाढले आहेत. देखभाल-दुरुस्ती खर्चातही वाढ झाली आहे.

अशातच सीएनजी दर वाढल्याने प्रवासी वाहतूक परवडत नसल्याचे सांगत टॅक्सी आणि रिक्षाच्या किमान भाडेदरात वाढ तत्काळ लागू करावी, अशी चालकांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन सुरू केलं जाईल असा टॅक्सी युनियनकडून देण्यात आला आहे.

सीएनजीच्या दरात यापूर्वी १३ ऑक्टोबर रोजी २ रुपये २० पैसे आणि ४ ऑक्टोबर रोजी २ रुपये ५९ पैसे वाढवण्यात आले होते. आता पुन्हा सीएनजी दर वाढल्यानं टॅक्सी चालकांसह खासगी सीएनजी वाहन चालकांनादेखील याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा