Advertisement

कोव्हिड योद्ध्यांचं 'सारथ्य' एसटीच्या हाती!

मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी इत्यादी लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी राज्य शासनानं एसटी महामंडळावर टाकली आहे.

कोव्हिड योद्ध्यांचं 'सारथ्य' एसटीच्या हाती!
SHARES

कोरोना महामारीच्या संकटामध्ये महाराष्ट्राची 'लोकवाहिनी' असलेल्या एसटीनं विविध ठिकाणी प्रवासी दळण-वळणाची सेवा देऊन शासनाच्या आरोग्य, पोलीस, महसूल, परिवहन या विभागांच्या खांद्याला खांदा लावून दमदार कामगिरी केली आहे.

मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी एसटीची मदत

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनानं मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी इत्यादी लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी राज्य शासनानं एसटी महामंडळावर टाकली आहे. 

मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत तसंच मंत्रालय, जे. जे. रुग्णालय, नायर रुग्णलाय, सायन रुग्णालय इत्यादी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या दर ५ मिनिटांला याप्रमाणं सुरू ठेवण्यात आल्या. 

या सर्व एसटी दररोज निर्जंतुक केल्या जातात. तसंच, प्रवासात समाजिक अंतराच्या नियमांचं काटेकोरपणं पालन केलं जातं. आजपर्यंत हजारो फेऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ६० मार्गांवर १० लाख अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांना दळण-वळणाची सुरक्षित सेवा एसटी देत आहे.

परराज्यातील श्रमिक मजुरांना एसटीचा आधार

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एसटीकडं पाहिलं जातं, त्या एसटी स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या. ९ मेपासून ३१ मेपर्यंत ४४ हजार १०६ एसटीद्वारे सुमारे ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आपल्या लाल परीनं मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.

मालवाहतुकीच्या क्षेत्रामध्ये एसटीचं पदार्पण 

प्रवासी वाहतूकी बरोबरच एसटी महामंडळ आता वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूकही करत आहे. राज्य शासनानं कोरोना व्हायरसमुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळास प्रवासी वाहनांमधून मालवाहतूक करण्यास परवानगी दिली. या सुवर्णसंधीचा लाभ घेत संपूर्ण राज्यभर अतिशय माफक दारात वक्तशीर व सुरक्षित मालवाहतूक सेवा विस्तारित केली जात आहे.

जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु

कोरोना महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीनं राज्यशासनानं दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून २२ मेपासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु करण्यात आल्या आहे.  

२३ मार्चपासून मागील २ महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद होती. हळूहळू एसटीची चाकं गतिमान होत असून, ग्रामीण अर्थकारणाचा 'कणा' असणारी आपली एसटी आशेचा किरण घेऊन धावत आहे.

राजस्थान येथील कोटा येथून विद्यार्थ्यांची वाहतूक

१२ वी नंतरच्या विविध प्रवेश परीक्षेच्या तयारी साठी राजस्थानातील कोटा इथं गेलेले विद्यार्थी लॉकडाऊनमुळं तेथेच अडकून पडले होते. अशा सुमारे १४०० विद्यार्थ्यांना एसटीच्या ७२ बसेसद्वारे राजस्थान येथून महाराष्ट्रातील त्यांच्या मूळगावी सुखरूप पोहचविण्यात आलं. या सर्व बसेस दररोज निर्जंतुक करण्यात आल्या असून, प्रवासात समाजिक अंतराच्या नियमंचं काटेकोरपणे पालन केलं जातं.

विविध संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळानं बस पुरवल्या आहेत. अशा अनेक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बँक व इतर संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बसेस देण्यात आल्या आहेत. या सर्व बस दररोज निर्जंतुक केल्या जातात. तसंच प्रवासात समाजिक अंतराच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं.

ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची वाहतूक

राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील कोरोना बाधित संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी एसटी बसेस देण्यात आल्या. 

ऊसतोड मजुरांची वाहतूक

लॉकडाऊनमुळं हंगाम संपण्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात अडकलेल्या सुमारे १००० ऊसतोड मजुरांना ४८ बसेसमधून त्यांच्या मूळगावी पोहचवण्यात आलं. या सर्व बस दररोज निर्जंतुक केल्या जातात. तसंच, प्रवासात समाजिक अंतराच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं.

१२  रुग्णवाहिका

मुंबई महापालिकेला कोविड-१९ रुग्णांची वाहतूक करण्यासाठी १२ एसटी बसेसचं रूपांतर रुग्णवाहिकेत करून दिलं आहे. या रुग्णवाहिका सध्या महापालिकेच्या सेवेत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना मदत

  • अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई, ठाणे, पालघर, या ३ विभागांमध्ये कोविड योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या सुमारे २००० एसटी कर्मचाऱ्यांना वेतना व्यतिरिक्त ३००रु. प्रति महा प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे.
  • राज्याच्या इतर भागातून मुंबईमध्ये आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात आली.
  • लॉकडाउन सुरु होण्यापूर्वी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत मास्क व सॅनिटायझर देण्यात आले.
  • मुंबई विभागात कार्यरत असलेल्या चालकांना फेस शिल्डचं वाटप करण्यात आलं.

सामाजिक भान जपत एसटीनं अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे कोविड योद्धे, आपल्या घरी जाण्यासाठी आतुर असलेले श्रमिक मजूर, विद्यर्थी, ऊसतोडणी कामगार मजूर अशा विविध घटकांचं 'सारथ्य' करण्याचं शिवधनुष्य लीलया पेललं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा