• मुंबईतल्या चार रेल्वे स्थानकांना मिळणार एअरपोर्ट लूक
  • मुंबईतल्या चार रेल्वे स्थानकांना मिळणार एअरपोर्ट लूक
SHARE

रेल्वे प्रशासनाने देशातील 32 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याची योजना हाती घेतली आहे. या योजनेत मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली स्थानकांचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत 2019 पर्यंत या चार स्थानकांना एअरपोर्ट लूक देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवरील विविध सेवांचे लोकार्पण मंगळवारी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालयात प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार डॉ.विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार माजिद मेमन, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार राज पुरोहित आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक उपस्थित होते.

देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास विविध टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ‘अ' वर्गातील रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात येणार असून पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली ही चार स्थानके ‘अ वर्गा’त येत असल्याने या स्थानकांनाही एअरपोर्ट लूट मिळणार आहे. या स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा मंजूर झाल्या असून 2019 पर्यंत पहिल्या टप्प्यातील स्थानके पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईत सर्वाधिक प्रवासी लोकलचा वापर करतात त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या सोईसुविधा पुरविणे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे प्रभू यांनी सांगितले. त्यानुसार अनेक रखडलेले प्रकल्प हाती घेऊन त्यांचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहेत. पश्चिम रेल्वेवर एकावेळेस नवीन लिफ्ट, एलिव्हेटेड डेक, सरकते जिने, बुकिंग कार्यालय, आरक्षण केंद्र, पादचारी पूल, स्कायवॉक, शौचालय इत्यादी सुविधांचे लोकार्पण करण्यामागे हाच उद्देश असल्याचे प्रभू म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या