रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक


SHARE

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल गाड्या अप आणि डाउन धिम्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.


मध्य रेल्वेवर असणार मेगाब्लॉक

मेन लाइनवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक स. १०.२७ ते दु. ३.५६ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे.

ब्लॉक दरम्यान डाऊन जलद मार्गावरील गाड्यांना स. १०.०५ ते दु. ३.२२ या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार असल्यामुळे या लोकल १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच ५०१०४ रत्नागिरी-दादर पसेंजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच धावणार असून तेथूनच रत्नागिरीसाठी परतीच्या प्रवासासाठी चालवण्यात येणार आहे.


हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स.११.१० ते दु.४.४० दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तर स. ९.५६ ते दु. ४.४३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. तसेच सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक स.९.५३ ते दु. ५.०९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून पनवेलसाठी स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहेत.


संबंधित विषय