Advertisement

एसटीच्या १०० कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला आहे.

एसटीच्या १०० कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला आहे. एसटी महामंडळाच्या तब्ब्ल १०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची विशेषत: एसटीची मोठी हानी झाली आहे. 

संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्यापूर्वी तो १४ दिवस आधी कर्तव्यावर असला, तरच त्याचा वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची वादग्रस्त अट एसटी महामंडळानं घातली आहे. या अटीमुळं आतापर्यंत केवळ ६ मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयच आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहेत. फक्त चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक अशा कर्मचाऱ्यांनाच ही मदत देताना कर्तव्यावर असणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचा मात्र विचार झालेला नाही. 

आणखी काही मृत कर्मचाऱ्यांचे वारस या अनुदानासाठी पात्र ठरणार असून, त्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याचं समजतं. कोरोनामुळं मृत्यू  होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना एसटीत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अद्याप त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मृतांत निम्मे चालक-वाहक असल्याची माहिती मिळते.

मृतांमध्ये  मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. एसटी महामंडळातील एकूण कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार ७६६ झाली आहे. ३२८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आतापर्यंत एकूण १२ अधिकारी, कर्मचारी बाधित झाले असून यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्तव्यावर असताना कोरोनामुळं मृत झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. कर्तव्यावर नसताना कोरोनामुळं मृत होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळं नियमानुसार जे पात्र ठरत आहेत, त्यांनाच आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत जेवढ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीही दिली जाणार आहे. कर्तव्यावर असलेल्या चालक, वाहकांना मास्क, सॅनिटाझर देणं बंद केलेलं नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा