पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या आणखी ३१ फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमबलबजावणी येत्या १ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.
वातनुकूलित लोकलच्या चर्चगेट, विरार, बोरिवली, दादर, मालाड स्थानकांदरम्यान फेऱ्या होतील. गर्दीच्या वेळेतच या सेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेवर ८ ऑगस्टपासूनच आठ वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दररोज धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची संख्या ४० वरून ४८ वर पोहोचली होती. आता आणखी ३१ फेऱ्यांची भर पडणार असून एकूण वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ७९ वर पोहोचणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सहा लोकल असून यापैकी पाच लोकल सेवेत होत्या. तर एक लोकल राखीव होती. आता सहावी लोकलही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून त्यामुळे फेऱ्यांची संख्याही वाढणार आहे.
वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आणि सायंकाळी काही फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी होत असून त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलामार्फत गर्दीचे नियंत्रण करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या ५६ फेऱ्या होत असून त्यात १० फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ६६ झाली आहे. मात्र कळवा, बदलापूर येथे प्रवाशांनी केलेल्या विरोधानंतर १० फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या.
हेही वाचा