Advertisement

पश्चिम रेल्वेवर नाईटब्लॉक, तर मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक


पश्चिम रेल्वेवर नाईटब्लॉक, तर मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
SHARES

पश्चिम रेल्वेवर येत्या रविवारी म्हणजेच 29 ऑक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रविवारी प्रवास करताना त्रास सहन करावा लागणार नाही.


पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री नाईटब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी २८ ऑक्टोबरला नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यत अप धिम्या तर रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत डाउन धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान वसई रोड ते विरार दरम्यानची अप आणि डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाउन जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.


मध्य रेल्वेवर या ठिकाणी असणार मेगाब्लॉक

मुंबई-उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइन आणि हार्बर मार्गावर रविवार २९ ऑक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर तर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानची डाउन जलद मार्गावरील वाहतूक डाउन धिम्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. परिणामी, डाउन जलद मार्गावरील लोकल गाड्या २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

सीएसएमटीहून सकाळी ९.३८ ते दुपारी २.५४ या वेळेत डाउन जलद मार्गावरुन सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्यांना, तर अप जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी १०.४६ ते दुपारी ३.१८ या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

तसेच, सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील गा्ड्यांची वाहतुक सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यत ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनने प्रवास करु शकतात.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा