Advertisement

एसी लोकलविरोधात प्रवाशांचा उद्रेक, रेल्वे प्रशासनाकडे केली 'ही' मागणी

ऐन गर्दीच्यावेळी सामान्य लोकल रद्द केल्याने प्रवासी चांगलेच भडकले.

एसी लोकलविरोधात प्रवाशांचा उद्रेक, रेल्वे प्रशासनाकडे केली 'ही' मागणी
SHARES

रेल्वे प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी पश्चिम (Western) आणि मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर एसी लोकल (AC Local) सुरू करण्यात आल्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसी लोकलची संख्याही वाढवली जाणार आहे. आधीच मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालवल्या जात आहेत.

मात्र वातानुकूलित लोकलचं तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठच फिरवली आहे. इतकंच नाही तर एसी लोकलविरोधात प्रवाशांचा रोषही वाढत चालला आहे. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांची नाराजी ओढवून घेतली आहे.

सोमवारी मध्य रेल्वेवरच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर (Badlapur Railway Station) सामान्य लोकल रद्द करुन एसी लोकल चालवण्याने प्रवाशांचा उद्रेक झाला. संतापलेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना (Station Master) घेराव घातला. ऐन गर्दीच्यावेळी सामान्य लोकल रद्द केल्याने प्रवासी चांगलेच भडकले. प्रवाशांचा उद्रेक पाहता पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत जमाला पांगवलं.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ५ वाजून २२ मिनीटांनी सुटणारी बदलापूर लोकल वातानुकुलित केल्याने सर्व प्रवाशांचा भार त्यानंतर असलेल्या ५ वाजून ३३ मिनिटांच्या खोपोली लोकलवर आल्याने प्रवाशांना आज गर्दीत प्रवास करावा लागला. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी सोमवारी संताप व्यक्त केला. 

तसंच स्टेशन मास्तर यांनी वरिष्ठांना याबाबत कळवू असं आश्वासन प्रवाशांना दिलं. एसी लोकल रद्द केल्याने त्यानंतर आलेल्या सामान्य लोकलला प्रवाशांची गर्दी वाढली. मध्य रेल्वे मार्गावरच्या कळवा स्थानकातही एसी लोकल रोखून धरण्याचा प्रकार घडला होता.

ठाणे-दिवा पाचवा आणि सहावा मार्ग झाल्यानंतर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होईल असं सांगण्यात आलं, पण एसी फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवासी चांगलेच नाराज झाले.

मध्य रेल्वे मार्गावर सध्या सहा एसी लोकल असून दररोज 66 फेऱ्या होतात. सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा अशा एसी लोकलच्या फेऱ्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. त्यांनतर ठाण्यातही अशाच प्रकारे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर सोमवारी बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सातच्या सुमारास प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयाबाहेर गोळा होत रेल्वे पोलिसांच्या कारभाराचा संताप व्यक्त केला.


हेही वाचा

"एसी लोकलपेक्षा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा, अन्यथा...", जितेंद्र आव्हाडांचा इशारा

एसी डबल डेकर बस ‘या’ तारखेपासून येणार मुंबईकरांच्या सेवेत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा