Advertisement

एसी लोकलला प्रवाशांकडून अद्यापही कमीच प्रतिसाद

पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांकडून अद्यापही चांगला प्रतिसाद मिळत नाही.

एसी लोकलला प्रवाशांकडून अद्यापही कमीच प्रतिसाद
SHARES

पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांकडून अद्यापही चांगला प्रतिसाद मिळत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गावर मिळून आतापर्यंत फक्त २,५८३ तिकीट आणि १,५५२ पासची विक्री झाली आहे. एका एसी लोकलची ५ हजार प्रवाशांची क्षमता पाहता तिकीट आणि पास विक्री अत्यंत कमी होत आहे.

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल ऑक्टोबरपासून, तर मध्य रेल्वेवर डिसेंबरपासून सुरू झाल्याने तिकीट व पासच्या विक्रीत पश्चिम रेल्वेला प्रवाशांचा हलका प्रतिसाद आहे. कोरोनामुळं मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊननंतर रेल्वे सेवा सुरू होताच सुरुवातीच्या ३० दिवसांतच ३४१ तिकीट व ३१५ पासची विक्रीच झाली होती. नवीन वर्षांतदेखील पहिल्या ३ दिवसांत ७४ तिकिटांची विक्री होतानाच ७१ पासांची विक्री झाली.

मध्य रेल्वेवर १७ डिसेंबरपासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर एसी लोकल सेवेत आली. या लोकलच्याही दररोज १२ फेऱ्या होतात. मुख्य मार्गावर लोकल असल्याने त्याला प्रतिसाद मिळेल असा अंदाज असतानाही त्याला अत्यल्पच प्रतिसाद प्रवाशांनी दिला आहे. ही सेवा प्रवाशांसाठी सुरू होताच पहिल्या आठवड्यात केवळ ९६ तिकीट आणि २६ पास प्रवाशांनी काढले होते. नवीन वर्षांत आतापर्यंत ३९ तिकिटांची, १७ पासची विक्री झाली आहे. प्रतिसाद कमी असतानाही सीएसएमटी ते कल्याण मार्गावर एसी जलद लोकल चालवण्याचाही प्रस्ताव आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर जानेवारी २०२० अखेरीस पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. या लोकलच्या दिवसभरात १० फेऱ्यांचे नियोजन केले. परंतु ही लोकल चालवताना सामान्य लोकलच्या रद्द केलेल्या फेऱ्यांमुळे अन्य प्रवाशांचे हाल होऊ लागले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ९५ टक्क्यांहून अधिक लोकल फेऱ्या होत असतानाच २ एसी लोकलही धावत आहेत. परंतु ट्रान्स हार्बरवर एसी सेवा पुन्हा सुरू करण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही.

मध्य रेल्वे

  • एकूण तिकीट विक्री-२६९
  • एकूण पास विक्री-९३
  • उत्पन्न-२ लाख ०२ हजार ५१८ रुपये

पश्चिम रेल्वे

  • एकूण तिकीट विक्री- २,३१४
  • एकूण पास विक्री- १,४५९
  • उत्पन्न- ३१ लाख ७० हजार ४७४ रुपये

वातानुकूलित लोकल

  • ५,९६४  एकूण प्रवासी क्षमता
  • १,०२८ प्रवासी आसन क्षमता
  • ४,९३६ उभे प्रवासी क्षमता
  • ७०० सध्याची प्रवासी मर्यादा
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा