Advertisement

ST कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ

एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ असून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन अनिल परब यांनी केलंय.

ST कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ
SHARES

एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी  मोठा दिलासा दिला आहे.  संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी आणि लिपिकांच्या मूळ पगारात सुमारे ७ हजार २०० रुपयांपासून ३ हजार ६०० रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे.

एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी चालक-वाहक यांचा मोठा हातभार असतो. यापूढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल.

तसंच कामगारांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करून आत्महत्या करणाऱ्या कुटुंबियांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असंही परब यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे. तसंच यापुढे कामगारांचा पगार दर महिन्याच्या १० तारखेपर्यत होण्याची हमी राज्य शासनानं घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं.

तसंच  कामगारांनी आता संप मागे घेऊन तातडीनं कामावर रूजू होण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

एसटी कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.  प्रवासी वाहतूक ठप्प झाल्यानं एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

एसटी कर्मचारी कामावर रूजू होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू व्हावी यासाठी कामगारांनी तातडीनं कामावर रूजू व्हावें. तसंच संपकाळात निलंबित आणि सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामावर रूजू व्हावं, असं आवाहनत्यांनी केलं.

कामावर रूजू होताच त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं परब  यांनी जाहीर केल.

तसंच नव्यानं झालेली वेतनवाढ नोव्हेंबरच्या पगारापासून देण्यात येईल, त्याचबरोबर वेतनासाठी आवश्यक निधी राज्य शासन देणार असून पगार वेळेत देण्याची हमीही शासनानं स्विकारली आहे, असेही मंत्री, अॅड.  परब यांनी स्पष्ट केलं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री अतिथिगृह इथं कामगारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

न्यायालयानं नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव त्यांनी शिष्टमंडळासमोर ठेवला होता. तसंच शिष्टमंडळानेही याबाबत पर्याय द्यावेत, असे आवाहनही केलं होतं. यावर कर्मचाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली जाईल, असंही अॅड.  परब यांनी शिष्टमंडळासमोर स्पष्ट केलं होतं. 

त्यानुसार बुधवारीही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एसटी कामगारांबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा