कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पणावर भाजपाचा बहिष्कार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुलुंडमधील महाकवी कालिदास नाटयगृहाचे उद्घाटन व्हावे, अशी आग्रही मागणी करणाऱ्या भाजपानेच या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे भाजपाच्या बहिष्कारातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनाचे सोपस्कार पार पडले. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत या नाट्यगृहाची देखभाल करणाऱ्या बृहन्मुंबई ललित कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय संचालक असलेले शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनाच स्थान दिले गेले नाही. त्यामुळे या प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिष्ठानच्या कारभाराची चौकशी

मुलुंडमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील महाकवी नाट्यगृहाचे लोकार्पण मंगळवारी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. मुलुंडमधील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलाचा कारभारा हा बृहन्मुंबई ललित कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने चालवला जात आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून प्रतिष्ठानच्या कारभाराबाबत भाजपाचे गटनेते मनोज कोटक तसेच स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी प्रशासनाकडे तक्रारी करून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली आहे. या प्रकरणी प्रतिष्ठानच्या कारभाराची चौकशी सुरु आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी?

प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक हे शिवसेना सचिव आदेश बांदेकर हे असून नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरच प्रशासनाने बांदेकर यांना स्थान दिले नाही. त्यामुळे प्रतिष्ठानची चौकशी सुरु असल्यामुळे त्यांचे नाव डावलले की शिवसेनेला शह देण्यासाठी हे नाव दिले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकहिताच्या कार्याला आमचा पाठिंबा पण…

खेळाची सुविधा मुलुंडकरांना चांगल्याप्रकारे मिळायला हवी, परंतु करदात्यांच्या पैसा खर्च करून ललित क्रीडा व कला प्रतिष्ठान खोडा घालत असेल तर अशा गैरकारभार करणाऱ्या प्रतिष्ठनच्या कार्यक्रमाला जाणे आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे 'कालिदास'च्या कार्यक्रमावर आमच्या पक्षाने बहिष्कार घातला असल्याचे भाजपाचे महापलिका गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.

मुलुंडमधील स्विमिंग पूल अद्यापही बंद आहेत. स्विमिंग पुलाची सुविधा मुलुंड आणि मुंबईकरांना देऊ शकत नाही. मग हा उद्घाटनाचा देखावा कशासाठी? नाट्यगृहाचे काम योग्य प्रकारे झालेले नाही. तसेच ललित क्रीडा व कला प्रतिष्ठानमधील कामगारांची होणारी गळचेपी, तसेच येथील गैरव्यवहार प्रकरणी आम्ही केलेल्या मागणीनुसार चौकशी सुरू आहे. त्यामुळे असे असताना आम्ही त्यात सहभागी कसे व्हायचे? लोकहिताच्या कार्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु बृहन्मुंबई ललित क्रीडा व कला प्रतिष्ठानच्या गैरकारभारात आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही. 

मनोज कोटक, गटनेते, भाजप

पाऊस जास्त पडत असेल तर काय करायचे?

मुंबईत कुठेही काही झाले, तरी महापालिकाच टीकेची धनी बनते. पाऊसच जर जास्त पडत असेल, तर त्याला महापालिका काय करणार? असे सांगत तुंबणाऱ्या मुंबईला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावसाच्या हवाली सोडले.

कोणताही गैरव्यवहार नाही - आदेश बांदेकर

प्रतिष्ठानमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी व्यवस्थापकीय संचालक आदेश बांदेकर यांना विचारले असता त्यांनी, आपल्यासह सहा जण व्यवस्थापकीय सचिव असून आम्हाला कुठलेही अधिकार नाहीत. या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळावर महापौरांसह गटनेतेही आहेत. इमारतीचे बांधकाम तसेच अन्य कामांमध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यामुळे गैरव्यवहाराचे कारणच नसल्याचे आदेश बांदेकर यांनी स्पष्ट केले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या