Advertisement

‘ललित कला’ची चौकशी होणार; आदेश बांदेकर अडचणीत?


‘ललित कला’ची चौकशी होणार; आदेश बांदेकर अडचणीत?
SHARES

मुंबई महापालिकेचे कालिदास नाट्यगृह, तरण तलाव, तसेच अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलात ललित कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अनागोंदी कारभाराची दखल महापलिका प्रशासनाने घेतली आहे. प्रतिष्ठानच्या विरोधात कामगारवर्गाकडूनच झालेल्या तक्रारीनंतर आता या प्रतिष्ठानच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी दोन उपायुक्तांची समिती गठित करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक शिवसेना सचिव आदेश बांदेकर असून आता त्यांचीच चौकशी करायला लावत भाजपाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.


प्रतिष्ठानची कार्यकारणी बरखास्त करा

ललित कला व क्रीडा प्रतिष्ठानकडून खेळापेक्षा व्यापारच अधिक केला जात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे प्रतिष्ठानच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी ही मागणी करतानाच प्रतिष्ठानची कार्यकारणी बरखास्त करण्याची मागणी केली.


शिवसेनेची बनली संस्थाने

विशेष म्हणजे या संस्थेचे मुख्य विश्वस्त हे शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते या प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक आहेत. त्यामुळे एकप्रकारे कालिदास नाट्यगृह आणि राजे शहाजी क्रीडा संकुल ही शिवसेनेची संस्थानेच बनली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.


कामगारांच्या तक्रारींच्या बाजूने भाजपा

अंधेरी व मुलुंडमधील क्रीडा संकुल तसेच तरण तलावांच्या ठिकाणी प्रतिष्ठानचा मनमानी कारभार सुरु आहे. आजवर नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही. येथील ११२ कामगारांपैकी ८५ कामगारांनी प्रतिष्ठानविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतरच भाजपाने आयुक्तांकडे ही तक्रार केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालनही या प्रतिष्ठानकडून होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.


कालिदासचे लोकार्पण होणार केव्हा?

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह व क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्यासाठी तब्बल ३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या नाटयगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्णही झाले आहे, मात्र अद्यापही त्याचे लोकार्पण करण्यात येत नाही. शिवाय महापौरांकडे वेळ मागूनही ते वेळ देत नाहीत अशी तक्रार भाजपाने केली आहे.


मुलुंडचे तरण तलाव पुन्हा बंद

मुलुंडच्या तरण तलावातील पाणी प्रदुषित असल्यामुळे बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरु करण्यात आले. परंतु पुन्हा दोनच दिवसांपूर्वी हे तरण तलाव बंद करण्यात आल्याची माहिती भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिली. पंधरा दिवसात दोन तरण तलाव बंद होण्याची वेळ आली आहे.


गैरव्यवहारांची चौकशी

प्रतिष्ठानच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त राम धस आणि उपायुक्त सुधीर नाईक यांची एक समिती गठित केली आहे. या समितीच्या वतीने ललित कला व क्रीडा संकुलातील गैरव्यवहाराची चौकशी, तसेच नियमबाह्य कारभाराची चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी करुन ते आपला अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर करतील.


एक दगडात दोन पक्षी

आदेश बांदेकर हे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे थेट बांदेकरांना टार्गेट करत भाजपाकडून तेथील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे बांदेकरही जातील आणि महापालिकेत भाजपाचे संख्याबळ वाढल्यामुळे भविष्यात प्रतिष्ठानची कार्यकारणी बरखास्त केली गेल्यास त्यावर आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची वर्णीही लावली जाईल. त्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा भाजपाचा हा डाव असल्याचे बोलले जात आहे.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा