ललित क्रीडा मंडळाच्या कारभाराची चौकशी करा- भाजपाची मागणी

 CST
ललित क्रीडा मंडळाच्या कारभाराची चौकशी करा- भाजपाची मागणी

मुंबई महापालिकेचे कालिदास नाट्यगृह, तरण तलाव तसेच अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलाचा कारभार ललित कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून चालवला जात आहे. परंतु या संस्थेच्या माध्यमातून खेळापेक्षा व्यापारच अधिक केला जात असल्याचा आरोप करत भाजपाने या संस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचा मुख्य विश्वस्त हे शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हे असून एकप्रकारे कालिदास नाट्यगृह आणि राजे शहाजी क्रीडा संकुल ही शिवसेनेची संस्थाने बनली आहे. त्यामुळे हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून शिवसेनेची ही संस्थानेच खालसा करण्याची मागणी भाजपाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह व क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु या नाटयगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊनही अद्याप त्याचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. याबाबत ललित कला व क्रीडा मंडळाच्यावतीने कुठलेही प्रयत्न होत नसल्यामुळे नाट्यगृह तसेच तरण तलावाला लाभ नागरिकांना मिळू शकत नाही. याबाबत स्थानिक भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मंडळाचे अध्यक्ष महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नाट्यगृह आणि तरण तलावाचे त्वरीत लोकार्पण केले जावे, अन्यथा भाजपा ते जनतेसाठी खुले करून देईल, असा इशारा प्रकाश गंगाधरे यांनी दिला आहे.

या दोन्ही क्रीडा संकुलांच्या व्यवहारात गैरप्रकार सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. येथील कामगारांची भरती तसेच लग्न कार्यालयांसाठी तसेच इतर कामांसाठी या जागा भाड्याने देऊन एकप्रकारे कला व क्रीडा जोपासण्याऐवजी याचे व्यापारीकरण सुरु असल्याचा आरोप गंगाधरे यांनी केला. मंडळाचे अध्यक्ष हे महापौर व उपाध्यक्ष हे महापालिका आयुक्त असले तरी मुख्य विश्वस्त हे शिवसेना सचिव आदेश बांदेकर हे आहेत. परंतु याठिकाणी आदेश बांदेकर यांची मनमानी चालत असल्यामुळे या मंडळाच्या गैरकारभाराची चौकशीची करण्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहून आपण ही मागणी करत असल्याचे गंगाधरे यांनी म्हटले आहे.

Loading Comments