महापालिका बांधणार आठ नवे तरण तलाव

  Mumbai
  महापालिका बांधणार आठ नवे तरण तलाव
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेच्या वतीने चालवण्यात येत असलेले तरण तलाव आधीच बंद पडताना आणि दुरुस्ती व नुतनीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना आता आणखी आठ तरण तलाव मुंबईत बनवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या दृष्टीकोनातून वरळी, मालाड लिबर्टी गार्डन आणि विक्रोळी पूर्व आदी तीन ठिकाणी हे तरण तलाव बनवण्यात येणार आहेत. शिवसेनेच्या वचननाम्याची पूर्ती म्हणून महापालिका प्रशासनाने हे तरण तलाव बनवण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात हे तीन तरण तलाव बनवले जाणार आहेत.

  तीन तरण तलाव बंद

  मुंबई महापालिकेच्या वतीने मुंलुंडमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल तरण तलाव, अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुल तरण तलाव, दादरमधील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक तरण तलाव, चेंबुरमधील जनरल अरुणकुमार वैद्य तरण तलाव, कांदिवलीतील सरदार वल्लभभाई तरण तलाव, दहिसरमधील मुरबाळी आदी ठिकाणी तरण तलाव बांधण्यात आले आहेत. परंतु, यापैकी मुलंडमधील प्रियदर्शनी आणि चेंबूर, कांदिवली हे तरण तलाव बंद असून नागरिकांना याचा वापर करता येत नाही. अंधेरी, शिवाजीपार्क आणि नव्याने बांधलेले दहिसरमधील तरण तलाव हे तीनच तलाव सध्या सुरु आहेत

  तरण तलाव हा पांढरा हत्तीच

  महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या तरण तलावांची देखभाल ही ललित कला व क्रीडा प्रतिष्ठान करते. परंतु तीन तरण तलाव बंद असून अंधेरी तरण तलाव अधुनमधून बंद असतो. दादरमधील तरण तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा बांधूनही त्यात गळती होत असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे दुरुस्ती व नुतनीकरणावर कोटयवधी रुपये खर्च होऊन प्रत्यक्षात जनतेला लाभ होत नाही. त्यामुळे एकप्रकारे हे तरण तलावे पांढरा हत्तीच असल्याचे चित्र आहे.

  तीन तलावांसाठी २५ कोटी रुपयांचा खर्च

  सध्या सुरु असलेल्या तरण तलावांचा योग्य वापर होत नसताना आणखी आठ नवीन तरण तलाव बांधण्यात येणार आहेत. त्यातील वरळी टेकडी जलाशय, मालाड लिबर्टी गार्डनच्या मागे चाचा नेहरू क्रीडांगण आणि विक्रोळी पूर्व येथील संत कबीर हायस्कूल टागोर नगरमधील राजर्षी शाहू महाराज क्रीडांगण आदी तीन ठिकाणांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. यासाठी प्रत्येकी सुमारे ८ कोटी रुपये याप्रमाणे तीन तरण तलावांसाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या तिन्ही तलावांसाठी तीन स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

  प्रियदर्शनी पार्कची जागा वगळली

  महापालिकेने तरण तलावांसाठी एकूण आठ जागा निश्चित केल्या असून त्यातील नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शनी पार्क परिसरात बांधण्यात येणाऱ्या तरण तलावांचा प्रस्ताव वगळण्यात आला आहे. हे पार्क खासगी संस्थेच्या ताब्यात असल्यामुळे, तसेच स्थानिकांचा विरोध असल्यामुळे याठिकाणी तरण तलाव न बनवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

  दहिसर, देवनारमध्येही होणार तरण तलाव

  पहिल्या टप्प्यात तीन तरण तलावांसोबत दहिसर पश्चिममधील आरटीओचा भूखंड व देवनार याठिकाणीही तरण तलाव बांधले जाणार आहेत. या ठिकाणच्या तरण तलावांसाठी निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे उद्यान कक्षाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  शिवसेनेची वचनपूर्ती

  शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये तरण तलाव बांधण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याची वचनपूर्ती म्हणून सात ठिकाणी तरण तलाव बनवले जात आहेत. त्यातील तीन तरण तलावांची उभारणी केली जाणार असून स्थायी समिती याला मंजुरी देते की प्रत्यक्षात नव्याने बांधण्यात येणाऱ्या तरण तलावांचा हा प्रस्ताव पुन्हा परतवून लावते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.